एसपी ऑफिस रोडवर फुटपाथवरील प्रकार : प्रवाशांसाठी बसथांबा उभारण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील प्रत्येक रस्त्यावर बस प्रवाशांसाठी स्मार्ट बसथांब्याची उभारणी करण्यात आली आहे. मात्र एसपी ऑफिस रोडवर एकही बसथांबा उभारण्यात आला नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. प्रवाशांना रस्त्याशेजारी असलेल्या घरासमोर बसावे लागते. मात्र नागरिकांनी बसू नये याकरिता काहींनी घरांसमोर दगड लावण्याचा प्रकार केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे एसपी ऑफिस रोडवर बसथांबा उभारण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
शहरात बसने प्रवास करणाऱया नागरिकांसाठी मनपा आणि स्मार्ट सिटी योजनेमधून विविध ठिकाणी बसथांबे उभारण्यात आले आहेत. स्मार्ट सिटी योजनेमधून 20 हून अधिक स्मार्ट बसथांबे उभारण्यात आले आहेत. काही रस्त्यांवर एकाच ठिकाणी जुना आणि नवीन असे दोन बसथांबे उभारण्यात आले आहेत. मात्र एसपी ऑफिस रोडवर एकही बसथांबा उभारण्यात आला नाही. तसेच सदाशिवनगर अथवा शहरातील बस डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडने (जिल्हा रुग्णालय रोड) ये-जा करीत असतात. पण एसपी ऑफिस रोडवरून सिटी बसच्या फेऱया होत नाहीत. त्यामुळे या ठिकाणी बसथांबा उभारण्यात आला नाही.
मात्र लांब पल्ल्याच्या बस संगोळळी रायण्णा चौकाजवळ थांबविण्यात येतात. राणी चन्नम्मा चौक व परिसरामधून ये-जा करणारे प्रवासी संगोळळी रायण्णा चौकाजवळ बसकरिता थांबलेले असतात. पण या ठिकाणी बसथांब्याची सुविधा नसल्याने ऊन-पावसात थांबावे लागते.
बसथांबा नसल्याने वृद्ध नागरिक, महिला किंवा लहान मुले रस्त्याशेजारी असलेल्या फुटपाथवर बसलेले असतात. पण याचा त्रास रहिवाशांना होत आहे. फुटपाथवर नागरिक बसू नयेत याकरिता काहींनी टोकेरी दगड बसविले आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या समस्येत आणखी भर पडली आहे. या रस्त्यावर बसथांबा उभारण्यात यावा, तसेच मनपा कार्यालय, पोलीस आयुक्त कार्यालय आणि केएलई, कोल्हापूर क्रॉस अशा विविध ठिकाणी जाणाऱया प्रवाशांसाठी सिटी बस सुरू करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.