खासगी बसचालकांचा मनमानी कारभार सुरूच :
प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर काही प्रमाणात खासगी बस सेवा सुरू झाली. परंतु अव्वाच्या सव्वा दर लावून ग्राहकांची लुबाडणूक करणाऱया या ट्रव्हल चालकांकडून अद्यापही मनमानी कारभार सुरूच आहे. प्रवासी पिक अप पॉईंटवर पोहोचल्यानंतर फेरी रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येत असल्यामुळे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रवासी गेले ‘तेल’ लावत या ट्रव्हल चालकांच्या भूमिकेमुळे ग्राहकच अशांना धडा शिकवतील, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढत गेल्याबरोबर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर पहिला राज्यांतर्गत बस सेवा सुरू झाली. तर आता देशांतर्गत काही शहरांना खासगी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. परिवहन मंडळाची बस सेवा अद्याप सुरू नाही. तर एकच रेल्वे पुण्याच्या दिशेने धावत असल्यामुळे याचा फायदा खासगी ट्रव्हल चालक उचलत आहेत. यासाठी बुकिंगही सुरू करण्यात आले असून, दुप्पट दराने तिकिटाचे दर आकारण्यात येत आहेत.
गुरुवारी रात्री बेळगावमधून एका खासगी ट्रव्हल कंपनीची बस पुण्याला जाणार होती. यासाठी तब्बल 2 हजार रुपये इतके तिकीट आकारण्यात आले होते. प्रवासी घरापासून पिकअप पॉईंटपर्यंत येऊन दाखल झाले. त्यानंतर त्यांना आज बस पुण्याला जाणार नाही, असे सांगण्यात आले. यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. भर पावसात दुप्पट रिक्षाचे भाडे देत पुन्हा घर गाठण्याची वेळ प्रवाशांवर आली.
प्रवाशांना नुकसान भरपाई देणार कोण?
पुणे येथे महत्त्वाच्या कामानिमित्त प्रवासी निघाले होते. परंतु अचानक बस रद्द करण्यात आल्यामुळे त्यांची सर्व नियोजित कामे ठप्प झाली. ट्रव्हल कंपनीने प्रवाशांना तिकिटाचे पैसे परत केले असले तरी झालेला मनस्ताप व रिक्षाचे भाडे प्रवाशांना खिशामधूनच घालावे लागले आहेत. मागील 15 दिवसांमध्ये असे तीन ते चार प्रकार घडल्याने खासगी बस चालकांविरोधात नाराजीचा सूर उमटत आहे.
कारवाईची होतेय मागणी
दुप्पट तिकीट दर आकारूनही सुरळीत बससेवा न देणाऱया खासगी ट्रव्हल्स चालकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. आपल्या मनमानी कारभाराचा फटका प्रवाशांना अनेकवेळा सहन करावा लागतो. पुरेशी प्रवाशांची संख्या नसली की बसमध्ये बिघाड असल्याचे कारण दाखवत फेरी रद्द करण्यात येते. यामुळे या खासगी ट्रव्हल चालकांना प्रवाशांच्या हिताचे कोणतेच देणे घेणे नाही का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.