वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशामध्ये प्रवासी वाहनांची किरकोळ विक्री नोव्हेंबर महिन्यात 19 टक्क्यांनी घसरली असल्याची माहिती वाहन उद्योग संघटना सियाम यांनी शुक्रवारी दिली आहे. वाहन विक्रीत घसरण होण्यास अन्य कारणांमध्ये प्रमुख कारण म्हणजे सेमिकंडक्टरच्या कमतरतेचा परिणाम राहिला असून यामुळे वाहन डिलर्सना वाहनांचा पुरवठा करण्यात अडचणी निर्माण होत असल्याचेही सांगितले आहे.
मागील महिन्यात प्रवासी वाहनांची किरकोळ विक्री 2,15,626 इतकी राहिली होती, तर नोव्हेंबर 2020 मध्ये हा आकडा 2,64,898 इतका असून तो सध्या 19 टक्क्यांनी कमी असल्याची नोंद केली आहे. यामध्ये दुचाकी वाहनांची एकूण किरकोळ विक्री ही 34 टक्क्यांनी घटून 10,50,616 वर राहिली आहे.
दुसऱया बाजूला नोव्हेंबर 2021 मध्ये तीनचाकी वाहनांची किरकोळ विक्री ही 22,471 वर राहिली आहे. तसेच सर्व प्रकारच्या वाहनांची एकूण विक्री ही एक वर्षाच्या अगोदर समान कालावधीत 18,89,348 वरुन घटून 12,88,759 वर राहिल्याची नोंद केली आहे.
चिप कमतरतेचा अडथळा
जगभरामध्ये सेमिकंडक्टरच्या कमतरतेमुळे वाहन उद्योगासह अन्य क्षेत्रेही प्रभावीत झालेली पाहायला मिळत आहेत. याचा सामना करण्यात येत असल्यामुळे वाहनांच्या विक्रीवर मोठय़ा प्रमाणात परिणाम होत आहे.