जूनमध्ये वाहनांची नोंदणी 23 टक्क्यांनी वधारली : स्थितीत सुधारणा
वृत्तसंस्था /मुंबई
देशभरात कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत असल्याचा फायदा वाहन उद्योगाला झाला असल्याची माहिती असून यामध्ये वाहन विक्रीत मोठी वाढ होत गेली आहे. दुसरीकडे जून 2021 मध्ये वाहनांची नोंदणीदेखील 22.62 टक्क्यांनी वाढल्याची माहिती फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (फाडा) यांनी दिली आहे.
कोरोना संसर्गाचा घटता आकडा व अनलॉकमुळे देशातील वाहन उद्योग मोठय़ा प्रमाणात सावरत आहे. फाडाच्या ताज्या अहवालानुसार जूनमध्ये वाहनांची विक्री ही 23 टक्क्यांनी वधारुन 12.1 लाखाच्या घरात पोहोचली आहे. यात प्रवासी वाहनांची विक्री सर्वाधिक म्हणजे 43 टक्क्यांनी मजबूत स्थितीत राहिली आहे. सदरच्या आकडेवारीत आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश, लक्षद्वीप आणि तेलंगणा आदी ठिकाणचे आकडे समाविष्ट करण्यात आले नसल्याचेही कंपनीने म्हटले आहे.
कोरोनाच्या दुसऱया लाटेचा असर कमी होत असून ग्राहक सामाजिक अंतरावर भर देत आपल्या परिवाराला आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षा प्राप्त होण्यासाठी वाहन खरेदीवर जोर देत असल्याचे दिसून आले आहे.
सेमीकंडक्टरची कमतरता जून महिन्यात मागणी वाढल्याने वाहन क्षेत्रात तेजी परतली आहे. हीच स्थिती आगामी काळातही कायम राहणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी जागतिक पातळीवर सेमीकंडक्टरची कमतरता आणि कोरोना विषाणूचे नवीन रुप यामुळेही चिंता निर्माण करणारे ढग वाहन क्षेत्रावर राहण्याची शक्यता आहे.