टोकियो पॅरालिम्पिक्स ः भारताच्या खात्यात आता 13 पदके, हरविंदरमुळे तिरंदाजीत ऐतिहासिक पहिले पदक
टोकियो / वृत्तसंस्था
भारताच्या प्रवीण कुमारने पुरुषांच्या उंच उडी (टी-64) इव्हेंटमध्ये रौप्यपदकाची कमाई केली तर हरविंदर सिंग (तिरंदाजी), अवनी लेखरा (नेमबाजी) यांनी आणखी 2 कांस्यपदके जिंकल्यानंतर टोकियो पॅरालिम्पिक्समध्ये शुक्रवारी भारताची पदकसंख्या 13 वर पोहोचली.
18 वर्षीय प्रवीण कुमारसाठी ही पदार्पणाची पॅरालिम्पिक्स असून त्याने येथे 2.07 मीटर्सचा नवा आशियाई विक्रम प्रस्थापित केला. या इव्हेंटमध्ये ग्रेट ब्रिटनच्या जोनाथन ब्रूम-एडवर्ड्सने 2.10 मीटर्स उडीसह सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली. प्रवीण कुमारसाठी ही वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी असून 2019 मध्ये या खेळात पदार्पण केल्यानंतर त्याचे हे पहिलेच महत्त्वाचे यश आहे.
टिनेजर प्रवीण कुमार नोएडाचा रहिवासी असून या पॅरालिम्पिक्समधील तो दुसरा सर्वात तरुण पदकजेता ठरला आहे. पोलंडच्या मॅसिएज लेपियाटोने 2.04 मीटर्स उडीसह कांस्यपदकाची कमाई केली. टी-64 क्लासिफिकेशन कृत्रिम पाय जोडलेल्या पॅरा ऍथलिट्ससाठी असते.
यंदाची टोकियो पॅरालिम्पिक्स भारतासाठी आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वोत्तम ठरत आले असून यंदा भारताने आतापर्यंत 2 सुवर्ण, 6 रौप्य व 5 कांस्यपदके जिंकली आहेत.
अवनी लेखरा दोन पॅरालिम्पिक्स पदके जिंकणारी पहिली भारतीय
19 वर्षीय सेन्सेशनल शूटर अवनी लेखरा ही शुक्रवारी पॅरालिम्पिक्समध्ये 2 पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली. तिने 50 मीटर्स रायफल 3 पोझिशन एसएच 1 इव्हेंटमध्ये कांस्यपदकाची कमाई केली. अवनीने यापूर्वी 10 मीटर्स एअर रायफल स्टँडिंग एसएच 1 इव्हेंटमध्ये सुवर्णपदकावर मोहोर उमटवली होती. अवनीसाठी ही पदार्पणाची स्पर्धा आहे.
चुरशीने लढल्या गेलेल्या फायनलमध्ये अवनीने 445.9 अंकांची कमाई केली. या इव्हेंटमध्ये चीनच्या झँग कुईपिंगने 457.9 या नव्या विक्रमासह सुवर्ण जिंकले. जर्मनीच्या नताशा हिलट्रॉपने 457.1 अंकांसह रौप्य पदकावर आपली मोहोर उमटवली. जयपूरस्थित अवनी लेखराला 2012 मधील कार अपघातात मणक्याला गंभीर दुखापत झाली होती.
अवनीपूर्वी जोगिंदर सिंग सोधीने एकाच पॅरालिम्पिक्समध्ये 2 पदके जिंकण्याचा पराक्रम गाजवला. मात्र, एकाही भारतीय महिला स्पर्धकाला आजवर असा पराक्रम करता आला नव्हता. जोगिंदरने 1984 पॅरालिम्पिक्समध्ये 1 रौप्य व 2 कांस्य अशी 3 पदके जिंकली होती. आश्चर्य म्हणजे त्याची ही तिन्ही पदके वेगवेगळय़ा क्रीडा प्रकारातील होती. त्याने रौप्य गोळाफेकीत तर 2 कांस्यपदके थाळीफेक व भालाफेक या इव्हेंट्समध्ये जिंकले होते.
हरविंदर सिंगने भारताला पॅरालिम्पिक्स इतिहासात तिरंदाजीतील पहिलेवहिले पदक मिळवून देत कांस्यपदकाची कमाई केली. पुरुषांच्या वैयक्तिक रिकर्व्ह इव्हेंटमध्ये रोमांचक शूट-ऑफमध्ये त्याने कोरियाच्या किम मिन सूवर मात केली.
कांस्यपदकाच्या प्ले-ऑफमध्ये 31 वर्षीय हरविंदरने 10 विरुद्ध 8 अशी बाजी मारली. या इव्हेंटमधील उपांत्य लढतीत हरविंदरला अमेरिकेच्या दहाव्या मानांकित केव्हिन मॅथरविरुद्ध 4-6 फरकाने पराभवाचा सामना करावा लागला होता. हरियाणातील कैथालमध्ये गुहला चिका या खेडय़ातील रहिवासी असलेल्या हरविंदरने शेवटच्या 16 मध्ये जागतिक क्रमवारीतील रशियाच्या 16 व्या मानांकित बाटो त्सिडेद्रोझिव्हला 8-7 अशा फरकाने मात दिली होती.
नंतर उपांत्यपूर्व फेरीत तो जर्मनीच्या मैक स्झॅर्जेव्स्कीविरुद्ध 6-2 अशा एकतर्फी फरकाने विजयी ठरला. मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या हरविंदरला अवघ्या दीड वर्षाचा असताना डेंग्यू झाला आणि स्थानिक डॉक्टराने दिलेल्या इंजेक्शनचा साईड इफेक्ट होत त्याचे पाय जवळपास निकामी झाले होते.
भगत-कोहली उपांत्य फेरीत, सुहास, तरुण, मनोजही पात्र
प्रमोद भगत व पलक कोहली या जोडीने बॅडमिंटनमध्ये मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले. पुरुष एकेरीत सुहास, तरुण धिल्लाँ व मनोज सरकार हे देखील शेवटच्या चारमध्ये पोहोचले.
भगत व कोहली यांनी थायलंडच्या सिरिपोंग व निपदा यांच्यावर 21-15, 21-19 अशा फरकाने मात दिली. ब गटातील या लढतीत 29 मिनिटात भारतीय जोडी विजय संपादन करण्यात यशस्वी ठरली. आता उपांत्य फेरीत भगत-कोहली हे हॅरी सुसान्तो व लियानी रत्री या इंडोनेशियन जोडीविरुद्ध लढणार आहेत.
एसएल 4 क्लासमध्ये जागतिक क्रमवारीतील तिसऱया मानांकित सुहासने इंडोनेशियाच्या हॅरी सुसान्तोचा अवघ्या 19 मिनिटात 21-6, 21-12 असा पराभव केला. तरुणने दक्षिण कोरियाच्या शिन क्युआंगविरुद्ध 21-18, 15-21, 21-17 तर मनोजने युक्रेनच्या ओलेक्सांद्रविरुद्ध 21-16, 21-9 असा विजय मिळवला. पलक कोहलीचे महिला एकेरीतील आव्हान मात्र उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. तिला जपानच्या काएदेविरुद्ध 11-21, 15-21 असा पराभव पत्करावा लागला.
जलतरणात सुयश, मुकुंदन फायनलच्या शर्यतीतून बाहेर
भारतीय जलतरणपटू सुयश नारायण जाधव व निरंजन मुकुंदन यांना पुरुषांच्या 50 मीटर्स बटरफ्लाय इव्हेंटमध्ये एस 7 क्लास फायनलसाठी पात्र ठरता आले नाही. 2017 आशियाई पॅरा स्पर्धेत सुवर्ण जिंकणाऱया सुयशला पहिल्या हिटमध्ये 5 वे तर बेंगळूरच्या 26 वर्षीय मुकुंदनला सहाव्या स्थानी समाधान मानावे लागले. प्रत्येक हिटमधील पहिले अव्वल 4 जलतरणपटूच फायनलसाठी पात्र ठरतात.