सरदार्स हायस्कूलच्या विद्यार्थ्याची आत्मियता, फोटो समाज माध्यमांवर हिट
प्रतिनिधी/ बेळगाव
तब्बल 9 महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर 1 जानेवारीपासून राज्यातील शाळा सुरू झाल्या. बऱयाच महिन्यांनंतर शाळेत दाखल झालेला एक विद्यार्थी गेटवर थांबून शाळेला नमस्कार करण्याचा फोटो शुक्रवारी समाज माध्यमांवर व्हायरल झाला. नकळत काढलेल्या या फोटोमुळे शाळेविषयीची विद्यार्थ्यांची आत्मियता व प्रेम हे दिसून येत होते. त्यामुळे या फोटोची दिवसभर चर्चा झाली.
शाळा सुरू असताना काही दिवस सुटी मिळाली तर घरी बसून आराम करू, असा विचार प्रत्येक विद्यार्थी करीत असतो. परंतु मार्च महिन्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभरातील शाळा बंद करण्यात आल्या. पर्याय म्हणून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात येत होते. परंतु काही पालकांकडे स्मार्टफोन नाही तर काही जणांकडे नेटवर्क नसल्याने हे शिक्षण परिपूर्ण होत नव्हते. या सर्वामुळे कंटाळलेले विद्यार्थी केव्हा एकदा शाळेत जातो, याची वाट पहात होते.
अखेर शुक्रवार दि. 1 जानेवारीपासून राज्यातील शाळा सुरू झाल्या. बेळगावमधील सरदार्स हायस्कूलचा नववीत शिकणारा विद्यार्थी अमित बागी हा सकाळी शाळेत दाखल झाला. विद्यागम उपक्रमांतर्गत त्याचे वर्ग भरणार होते. तत्पूर्वी तो गेटवर थांबून शाळेसमोर नतमस्तक झाला. शाळेतील शिक्षक रणजित चौगुले यांनी हाच क्षण आपल्या मोबाईलच्या कॅमेऱयात कैद केला. ज्या शाळेला विद्येचे घर म्हणून ओळखले जाते त्या मातेला वंदन करून हा विद्यार्थी शाळेत आल्यामुळे विद्यार्थ्यांची शाळेविषयीची आत्मियता दिसून येते.
समाज माध्यमांवर फोटो ठरला हिट
शिक्षक रणजित चौगुले यांनी काढलेला हा फोटो शुक्रवारी सर्वत्र व्हायरल झाला. नकळत काढलेला हा फोटो चर्चेचा विषय ठरला. अनेकांच्या मोबाईल स्टेटसवर फोटो दिसून आला. विद्यार्थी शाळेत येण्यास कचरतात. परंतु याच शाळेची ओढ या फोटोतून दिसून येत आहे.