ऑनलाईन टीम/तरुण भारत
या वर्षी डिसेंबर महिन्यात गुजरातमध्ये १८२ जागांसाठी विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचा मोठा पराभव झाला आहे. पंजाबमध्ये काँग्रेसच्या हातची सत्ता देखील गेली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षात चलबिचल सुरू झाली असून आगामी निवडणुकांसाठी पूर्ण तयारीनिशी उतरण्याची भूमिका नेतेमंडळींकडून मांडली असताना प्रशांत किशोर काँग्रेससाठी रणनीती करणार असल्याचं बोललं जात आहे. परंतु काही दिवसांपूर्वी प्रशांत किशोर काँग्रेसवर टीका करताना पाहायला मिळत होते. पण अचानक किशोर यांनी आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेससोबत काम करण्याची इच्छा असल्याचे राहुल गांधींना फोन करून बोलल्याचे सूत्रांनी सांगितलं आहे.
आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी प्रशांत किशोर काँग्रेससाठी रणनीती आखणार आहेत. खुद्द प्रशांत किशोर यांनीच राहुल गांधींशी याबाबत सविस्तर चर्चा केल्याचं सांगितलं जात आहे. तर प्रशांत किशोर यांनी स्वत: राहुल गांधींशी चर्चा करून गुजरात निवडणुकांसाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
प्रशांत किशोर यांनी फक्त गुजरात निवडणुकांपुरतंच काँग्रेससाठी काम करणार असल्याचा प्रस्ताव राहुल गांधींशी बोलताना ठेवल्याचं सांगितलं जात आहे. यासंदर्भात अंतिम निर्णय काँग्रेस हायकमांडकडून घेतला जाणार आहे. गुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या काँग्रेसच्या बैठकीमध्ये यावर चर्चा केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.