नवी दिल्ली/प्रतिनिधी
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आज काँग्रेसचे राहुल गांधी यांची भेट घेतली. दरम्यान, २०१७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी कॉंग्रेससाठी रणनीती आखली होती. गेल्या महिन्यात किशोर यांनी शरद पवारांशी ३ पाटोपाठ बैठक घेतल्या आहेत.
दरम्यान राहुल गांधी आणि प्रशांत किशोर या दोघांची भेट राहुल यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झाली. या बैठकीकडे मोठ्या संदर्भाच्या दृष्टीने पाहिले जात आहे. पश्चिम बंगाल निवडणुकीच्या निकालापासून प्रशांत किशोर एका वेगळ्या मार्गाने कार्यरत आहेत. गेल्या महिन्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमवेत त्यांनी बैठका घेतल्या. अशा परिस्थितीत हे लक्षात येते की भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सक्षम आणि कणखर विरोधी पक्ष निर्माण करण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावणार तर नाही ना हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेसच्या (टीएमसी) विजयात महत्त्वाची भूमिका निभावणारे प्रशांत किशोर यांनी ११ जूनला शरद पवार यांची मुंबई येथील निवासस्थानी भेट घेतली. यानंतर २१ जून रोजी दिल्लीत दोघांमध्ये संवाद झाला होता, त्यानंतर २३ जूनला पुन्हा दोघांची भेट झाली. आता किशोर यांनी आज राहुल गांधी यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
राहुल गांधींची भेट घेतल्यानंतर पुन्हा एकदा उत्तर प्रदेश निवडणुकीत ते कॉंग्रेससाठी रणनीती आखतील काय, असा प्रश्न पडला आहे. त्यांनी २०१७ मध्ये काँग्रेसची रणनिती आखली होती. परंतु, त्यावेळी यश मिळाले नाही. पण प्रशांत यांना पंजाबमध्ये यश आले आणि यावेळी ते पंजाब निवडणुकीत अमरिंदर सिंग यांच्यासमवेत कॉंग्रेससाठी काम करतील. या बैठकीत आगामी निवडणुकांबाबत चर्चा झाली आहे की २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी मोठे चित्र तयार करण्याबाबत चर्चा झाली असेल, असेही बोलले जात आहे.