वृत्तसंस्था/ लंडन
सध्या इंग्लंडच्या दौऱयावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाला कोरोनाचा फटका बसला असून मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रशिक्षक रवि शास्त्री यांची कोरोना चाचणी घेण्यात आली आणि त्यामध्ये ते पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. भारतीय क्रिकेट संघातील साहाय्यक प्रशिक्षक वर्गातील अन्य तीन व्यक्ती शास्त्रींच्या संपर्कात आल्याचे समजते. शास्त्रींसह या सर्वांना विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले आहे. भारतीय संघाबरोबर इंग्लंड दौऱयावर गेलेले प्रशिक्षक वर्गातील भरत अरुण, आर. श्रीधर, आणि फिजिओ नितीन पटेल यांनाही आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. या सर्व व्यक्तींची येत्या काही दिवसामध्ये पुन्हा आरटी-पीसीआर चाचणी घेतली जाईल. 59 वर्षीय रवि शास्त्री तसेच अन्य तीन व्यक्तींना दहा दिवसांसाठी विलगीकरणात रहावे लागेल, अशी माहिती बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी दिली आहे.