35 लाख रुपये रोख रकमेसह चार वाहने जप्त : सीसीबीचे प्रमुख संदीप पाटील यांची माहिती : संबंधितांवर कायदेशीर कारवाई
प्रतिनिधी / बेंगळूर
कर्नाटक लोकसेवा आयोग अंतर्गत घेण्यात येणाऱया प्रथमश्रेणी साहाय्यकपद परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी सीसीबी पोलिसांनी आतापर्यंत 14 जणांना अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून 35 लाख रुपये रोख रक्कम आणि चार वाहने जप्त केली आहेत, अशी माहिती सीसीबीचे प्रमुख संदीप पाटील यांनी दिली. बेंगळुरात पत्रकारांशी ते बोलत होते.
संदीप पाटील पुढे म्हणाले, शनिवारी आम्हाला प्रश्नपत्रिका फुटल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार आम्ही चंद्रू आणि राजप्पा यांना अटक करून त्यांची चौकशी केली असता, प्रश्नपत्रिका फुटल्याची माहिती उघडकीस आली. त्यानंतर सीसीबी अधिकाऱयांच्या पथकाने त्यांच्या निवासस्थानांवर छापा टाकला असता, त्याठिकाणी प्रश्नपत्रिका असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार तपासाला गती देत आतापर्यंत 14 जणांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे, असे त्यांनी सांगितले.
सदर प्रकरण गंभीर असून प्रश्नपत्रिका कोणत्या पातळीवर फुटली आहे, या प्रकरणात कोणाकोणाचा समावेश आहे, याची चौकशी सीसीबी अधिकारी करीत आहेत. तसेच यात समावेश असणाऱयांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. शनिवारी बेंगळूरमध्ये केंद्रीय गुन्हे शाखेच्या (सीसीबी) पोलिसांनी कारवाई करून राचप्पा, चंद्रू यांच्यासह सहा जणांना अटक केली होती. त्यांच्याजवळून 24 लाख रुपयांची रोकड, 3 वाहनांसह प्रश्नपत्रिका जप्त केली होती, असेही संदीप पाटील म्हणाले.
सविस्तर चौकशी करण्याचा मुख्यमंत्र्यांचा आदेश
प्रश्नपत्रिका फुटीप्रकरण उघडकीस आल्यानंतर शनिवारी रात्रीच आपण अधिकाऱयांशी चर्चा केली आहे. प्रश्नपत्रिका फुटीसाठी कारणीभूत असलेल्यांचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी सविस्तर चौकशी करा, असा आदेश मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी दिला आहे.
सर्व संशयितांना लवकरच अटक करणार : बोम्माई
एफडीए प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणातील सर्व संशयितांना लवकरच अटक केली जाईल. या प्रकरणामागे कोणकोणत्या लोकांचा समावेश आहे. याचा शोध घेतला जात आहे. सदर प्रकरण गंभीरपणे घेतले असून सुरक्षितता बाळगूनसुद्धा प्रश्नपत्रिका फुटली आहे. सर्व तऱहेने या प्रकरणाच्या चौकशीला गती देण्यात आली आहे. प्रश्नपत्रिका फोडून त्याची विक्री करत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकून संशयितांना ताब्यात घेतले आहे. यापूर्वीच अनेकांना अटक करण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे, असे गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी सांगितले.