आमदार सुदिन ढवळीकर यांची टीका
वार्ताहर / मडकई
दहावीच्या इंग्रजी प्रश्नपत्रीकेतून गोव्याच्या भ्रष्टाचाराचे पितळ उघडे पाडण्याचा जो प्रकार घडला ते पाहिल्यानंतर ‘कुणाचा पायपोस कुणाला नाही’ असे खेदाने म्हणावे लागते. माजी उपमुख्यमंत्री तथा आमदार सुदिन ढवळीकर यांनी सरकारवर अशा शब्दात टिका करताना या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
बांदोडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दहावीच्या प्रश्नपत्रीकेत विचारलेल्या प्रश्नाचा विचार केल्यास गोवा शांलात परीक्षा मंडळ, शिक्षण खाते व ज्यांनी प्रश्नपत्रिका काढली यांच्यात कुठलाच समन्वय नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे ही गोची करुन घेण्याची वेळ सरकारवर आली आहे. परीक्षेच्या माध्यमातून विचारलेल्या पोर्तुगिज पासपोर्ट व नोकरीच्या वशिल्याच्या प्रश्नामुळे सर्वसामान्यांनापुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिक्षण क्षेत्रात घडलेल्या या प्रकारामुळे गोव्यात खळबळ उडवून दिलेली आहे. त्यामुळे सरकारचे पितळ उघडे पडले आहे. या प्रकारातून सरकारने हल्लीच केलेल्या नोकरी भरतीत काहीतरी काळेबेर असल्याचा संशय घेण्यास वाव आहे. ज्यांनी ही प्रश्नपत्रीका काढली, त्याला या नोकर भरतीबाबत शंका व गोंधळाची कल्पना असल्यामुळेच त्यांनी हा प्रश्न विद्यार्थ्याना टाकला असावा. घडल्या प्रकाराची नैतीक जबाबदारी स्वीकारून सरकारने या नोकरी भरतीतून नेमके काय घडले आहे, याची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी आमदार सुदिन ढवळीकर यांनी केली आहे.