इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनची सूचना
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोव्हिड-19 च्या प्रकोपामुळे अवघ्या जागतिक स्तरावरील सर्व क्रीडा स्पर्धा ठप्प झाल्या आहेत. पण, इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनला मात्र या परिस्थितीतही आयपीएल स्पर्धा व्हावी, असे वाटते. चाहत्यांचे स्वास्थ्य धोक्यात येऊ नये, यासाठी रिकाम्या स्टेडियममध्ये आयपीएलचे सामने खेळवावेत, अशी मागणी त्याने रविवारी केली.
‘जुलै-ऑगस्टमध्ये छोटेखानी आयपीएल स्पर्धा होण्यास वाव आहे. आयपीएलने क्रिकेट हंगामाला सुरुवात होते. माझ्या मते जागतिक स्तरावरील करारबद्ध प्रत्येक क्रिकेटपटू आयपीएल खेळण्यासाठी इच्छुक आहे’, असा पीटरसनने येथे दावा केला. स्टार स्पोर्ट्सच्या एका क्रिकेट शोमध्ये तो बोलत होता.
आयपीएल स्पर्धा ही केवळ खेळाडू आणि प्रँयायझींसाठीच नव्हे
तर त्यामागे राबणाऱया अनेक हातांसाठी देखील तितकीच महत्त्वाची आहे, असे पीटरसनचे मत
आहे. ‘यंदा बराच कालावधी उलटून गेला आहे. पण, जो कालावधी मिळेल, त्यात तीन स्टेडियम्समध्ये
मिळून तीन आठवडय़ात छोटेखानी आयपीएल स्पर्धा होऊ शकते’, असे तो
म्हणतो.
पूर्वनियोजित रुपरेषेप्रमाणे, यंदाची आयपीएल स्पर्धा दि. 29 मार्चपासून खेळवली जाणार होती. पण, नंतर ती दि. 15 एप्रिलपर्यंत लांबणीवर टाकली गेली. सध्याच्या परिस्थितीत ही स्पर्धा होण्याची शक्यता अगदीच अंधूक आहे.
संजय मांजरेकरही सहमत
पीटरसनचा दावा सद्यस्थितीत अजिबात योग्य ठरत नाही. पण, माजी फलंदाज, समालोचक संजय मांजरेकरने पीटरसनला सहमती दर्शवली आहे. ‘सध्या ठप्प झालेल्या अर्थकारणाला आयपीएलमुळे काहीशी चालना मिळेल. इथे केवळ मुंबई इंडियन्स, धोनी किंवा विराटसाठी नव्हे तर प्रत्येक घटकांसाठी ही स्पर्धा महत्त्वाची आहे. अनेकांसाठी ते अर्थार्जनाचे उत्तम साधन आहे’, असे मांजरेकर म्हणाला.
अलीकडेच, राजस्थान रॉयल्सचे व्यवस्थापकीय अध्यक्ष मनोज बदालेनी छोटेखानी आयपीएल स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे मत मांडले होते. अगदी बीसीसीआय व प्रँचायझीही या संकल्पनेशी राजी आहेत. येत्या काही दिवसात याबाबत अंतिम निर्णय अपेक्षित आहे.
कसोटीपेक्षा आयपीएल महत्त्वाचे ठरु शकत नाही : स्ट्रॉस
कारकिर्दीच्या सर्वोत्तम बहरात असताना केविन पीटरसनचा वाद मी व्यवस्थित हाताळू शकलो नाही, याची कबुली माजी इंग्लिश कर्णधार ऍन्ड्रय़्रू स्ट्रॉसने दिली. पण, कोणत्याही खेळाडूने कसोटी क्रिकेटपेक्षा आयपीएलला महत्त्व दिले तर मी त्याचा निश्चितपणाने विरोध करतो, असेही तो म्हणाला. आयपीएलमध्ये खेळण्याचे भरभक्कम मानधन मिळते, याची मला कल्पना आहे. पण, कसोटी क्रिकेटपेक्षा आयपीएल महत्त्वाचे ठरु शकत नाही, असे स्ट्रॉसने स्पष्टपणे सांगितले.
स्ट्रॉस ईसीबीच्या क्रिकेट संचालकपदी नियुक्त असताना त्याने इंग्लिश खेळाडूंना आयपीएलमध्ये सहभागी होता यावे, यासाठी एक विंडो ठरवला होता. पण, पीटरसनने त्यावेळी आयपीएलमध्ये खेळण्यासाठी आणखी अधिक कालावधी मिळावा, अशी आग्रही मागणी सातत्याने केली होती.
‘मुळातच, आयपीएलचा कालावधी मोठा असतो. एखाद्या खेळाडूला मुभा दिल्यास संघात वेगवेगळे वाद निर्माण होऊ शकतात, याची मी ईसीबीला कल्पना दिली होती. अगदी केपीला देखील मिळालेल्या विंडोत आयपीएल खेळण्याची सूचना मी केली होती. पण, तो यासाठी राजी नव्हता. यामुळे वाद निर्माण झाला’, असे स्ट्रॉसने येथे नमूद केले.
2014-15 मध्ये ऍशेस मालिकेत उत्तम प्रदर्शनानंतरही केविन पीटरसनला वगळले गेल्यानंतर त्याने मॅट प्रायर, स्टुअर्ट ब्रॉड यांच्यावर आपल्या आत्मचरित्रातून टीका केली होती. शिवाय, सहकार्य न केल्याबद्दल स्ट्रॉसचाही समाचार घेतला होता. पीटरसन आपल्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात अनेक वादात सापडला. 2012 कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकन खेळाडूंना मेसेज पाठवल्याने तो अडचणीत आला होता. नंतर पीटरसनला दौऱयाच्या मध्यातूनच मायदेशी पाठवण्यात आले. 2013-14 मध्ये ऍलिस्टर कूकच्या नेतृत्वाखाली इंग्लंडला 0-5 असा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर पीटरसनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपुष्टात आली.