अमेरिकेसमोर पाकिस्तानची पुन्हा विनवणी
वृत्तसंस्था / इस्लामाबाद
पाकिस्तानच्या सत्तेवरून इम्रान खान पायउतार झाल्यापासून चीनसोबतच्या मैत्रीतही अंतर दिसून येत आहे. नव्या शाहबाज शरीफ सरकारने चीनपासून अंतर राखण्यास सुरुवात केली आहे. याचा पहिला संकेत पाक सरकारने चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरचे (सीपॅक) प्राधिकरण भंग करून दिला आहे. 2013 मध्ये सुरू करण्यात आलेल्या 5 लाख कोटी रुपयांच्या सीपॅक अंतर्गत चीनकडून पाकिस्तानात पायाभूत सुविधांचा विकास करणे अपेक्षित होते. पाकिस्तान चीनसोबतचा सीपॅकचा महत्त्वाकांक्षी करारही रद्द करण्यास तयार आहे. परंतु याकरता अमेरिकेने एखादा महाप्रकल्प पाकिस्तानात आणावा अशी त्याची अट आहे.
पाकिस्तानातील सर्वात मोठा प्रांत बलूचिस्तानात या प्रकल्पाला मोठा विरोध होत आहे. याचदरम्यान बलूच लिबरेशन आर्मीने सीपॅकमध्ये कार्यरत चिनी कर्मचाऱयांवरील हल्ले वाढविले आहेत. मागील आठवडय़ात एका बलूच महिला आत्मघाती हल्लेखोराने स्फोट घडवून आणत तीन चिनी कर्मचाऱयांचा जीव घेतला आहे. तर शाहबाज सरकारने सीपॅक प्राधिकरण भंग करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अनेक प्रकल्पांमध्ये विलंब होत नसल्याने हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
वीजनिर्मिती प्रकल्प बंद
सीपॅक अंतर्गत चीन पाकिस्तानात सुमारे 2 हजार मेगावॅटचा प्रकल्प निर्माण करत होता. परंतु चनीच्या गुंतवणुकदारांना पाकिस्तान सरकारकडून सुमारे 30 हजार कोटी रुपयांचे पेमेंट करण्यात आलेले नाही. अशा स्थितीत हा प्रकल्प बंद करण्यात आला आहे. या ऊर्जा प्रकल्पांचे आतापर्यंत 40 टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले होते.
पाकिस्तानात मोठे वीजसंकट
पाकिस्तानात सध्या मोठे वीजसंकट निर्माण झाले आहे. असहय़ उष्णतेतही पाकिस्तानातील 28 पेक्षा अधिक शहरांमध्ये 12 तासांचे भारनियमन सुरू आहे. चीनच्या झिनझियांगपासून ग्वादारपर्यंत रेल्वेमार्ग निर्माण करण्याचे काम सुरू केले जाणार होते. सुमारे 55 हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला पाकिस्तानचा सर्वात मोठा रेल्वेप्रकल्प ठरविण्यात येत होते. परंतु सुमारे 5 वर्षांपासून हा प्रकल्प ताटकळत राहिल्याने पाक सरकारने आता तो बासनात गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे.