ऑनलाईन टीम / मुंबई :
सुप्रसिद्ध अभिनेते इरफान खान यांचं आज निधन झाले. ते 54 वर्षांचे होते. त्यांनी आज मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूड जगतात शोककळा पसरली आहे.
इरफान खान यांना 2016 मध्ये न्यूरोएन्डोक्राईन ट्यूमर नावाचा आजार झाला होता. त्यांच्यावर लंडन मध्ये उपचार चालू होते. त्यांनी जबर इच्छाशक्तीच्या जोरावर या कॅन्सरवर मात केल्यानंतर ते पुन्हा 2019 मध्ये भारतात परतले होते.
त्यांनी लाईफ इन अ मेट्रो, पानसिंग तोमर, द लंचबॉक्स, हैदर, गुंडे, पिकू , तलवार, ‘हिंदी मीडियम’ यांसारख्या चित्रपटांमधून दमदार भूमिका साकारल्या होत्या. अंग्रेजी मिडीयम हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.
इरफान खान यांना कला क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल भारत सरकारच्या ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तसेच ‘पानसिंग तोमर’ या चित्रपटासाठी त्यांना ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या’ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
जवळपास 30 वर्षांच्या करिअरमध्ये इरफानने 50 हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले. बॉलिवूडसोबतच त्यांनी हॉलिवूडमध्येही छाप सोडली. यात जुरासिक वर्ल्ड, स्लमडॉग मिलेनियर यांचा समावेश आहे.
दरम्यान, आजच सकाळी इरफान यांच्या प्रवक्त्यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले होते. मात्र काहीच तासात त्यांच्या मृत्यूची बातमी आली आहे. संपूर्ण जगभरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.