संपत्ती वाढीसह यादीत अंबानी 12 व्या स्थानी : जेफ बेजोस दुसऱया स्थानी
वृत्तसंस्था/ कॅलिफोर्निया
नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रसिद्ध उद्योजक व टेस्लाचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांच्या संपत्तीमध्ये घट झाल्याचे दिसले. ब्लुमबर्ग मिलेनियर इंडेक्स यांच्यानुसार वर्षाच्या पहिल्याच दिवशी मस्क यांच्या संपत्तीमध्ये 3.19 अब्ज डॉलर्सची घसरण नोंदवली गेली. एलॉन मस्क नंतर फेसबुकचे मार्क झुकरबर्ग आणि ऍमेझोनचे जेफ बेझोस यांच्या संपत्तीतही अनुक्रमे 2.91 अब्ज डॉलर्स, 1.93 अब्ज डॉलर्स इतकी घट झाल्याचे दिसून आले.
ब्लुमबर्गनुसार टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांची संपत्ती 270 अज्ब डॉलर्सवर पोहोचली आहे. तर दुसरीकडे मार्क झुकरबर्ग यांची संपत्ती 125 अज्ब डॉलर्सवर असून बेझोस यांची संपत्ती 192 अब्ज डॉलर्सवर राहिली आहे. क्रमवारीमध्ये एलॉन मस्क पहिल्या तर जेफ बेझोस दुसऱया स्थानी राहिले आहेत. मार्क झुकरबर्ग क्रमवारीमध्ये सहाव्या स्थानी आहेत.
अंबानींच्या संपत्तीत वाढ
भारताचे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या संपत्तीमध्ये पहिल्या दिवशी वाढ झाल्याचे दिसले आहे. अंबानींची संपत्ती 285 दशलक्ष डॉलर्सने वाढून 90 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. अब्जाधीश संपत्ती यादीमध्ये ते बाराव्या स्थानी राहिले आहेत. तर गौतम अदानी 76.5 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह 14 व्या स्थानी राहिले आहे.