ऑनलाईन टीम / मुंबई :
प्रसिद्ध गायक, संगीतकार बप्पी लहरी यांचं निधन झालं. ते ६९ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून बप्पी लहरी यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर मुंबईतील क्रिटी केअर या खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली.
बप्पी लहरी अनेक व्याधींनी त्रस्त होते. त्यामुळे मागील महिनाभरापासून ते मुंबईतील क्रिटी केअर रुग्णालयात उपचार घेत होते. यानंतर त्यांना सोमवारी (१४ फेब्रुवारी) घरी सोडण्यात आलं. मात्र, मंगळवारी त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. त्यामुळे त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मध्यरात्री ऑबस्ट्रक्टिव्ह स्लीप ॲप्नियामुळे त्यांचे निधन झाले.
बप्पी लहरी यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९५३ झाला होता. १९७३ सालच्या ‘नन्हा शिकारी’ या चित्रपटाद्वारे बप्पी लहरी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पण त्यांना खऱ्या अर्थाने यश मिळायला १९८२ साल उजाडावे लागले. १९८२ मध्ये आलेल्या मिथुन चक्रवर्ती यांच्या ‘डिस्को डान्सर’ या चित्रपटामुळे बप्पी लहरी प्रकाशझोतात आले. त्यानंतर बप्पी लहरी यांनी अनेक चित्रपटांमध्ये गायक आणि संगीतकार म्हणून काम केले.