प्रतिनिधी / मुंबई
कोरोनाच्या संसर्गामुळे प्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारुवाला यांचे आज निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली.
एका आठवड्यापासून दारुवाला यांना श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांना आठवडाभरापूर्वीच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर अहमदाबादमधील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
दारुवाला हे सुप्रसिद्ध ज्योतिषी होते. ज्योतिष क्षेत्रात त्यांचे कार्य खूप मोठे होते. ११ जुलै १९३१ ला त्यांचा जन्म झाला होता. पारशी समाजाचे असूनही ते गणपतीचे भक्त होते. पारंपरिक ज्योतिष, पाश्चिमात्य ज्योतिष, टॅरो कार्ड, अंकशास्त्र, हस्तरेखा शास्त्र या विषयांमध्ये त्यांचा गाढा अभ्यास होता. विविध वृत्तपत्रे, टीव्ही चॅनेल्स यांवर ते भविष्य सांगत होते.