सात हजारहून अधिक अर्ज बुडाकडे दाखल : 2700 फ्लॅट उपलब्ध करण्यात येणार
प्रतिनिधी /बेळगाव
बुडाच्यावतीने कणबर्गी परिसरात वसाहत योजना राबविण्याचा प्रस्ताव असून याठिकाणी बहुमजली रहिवासी इमारती निर्माण करण्यात येणार आहेत. याअंतर्गत 2700 गरिबांना फ्लॅट उपलब्ध करून देणार असल्याने याकरिता सर्वेक्षण करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. मंगळवारपर्यंत सात हजारहून अधिक अर्ज बुडाकडे जमा झाले आहेत.
बुडाच्यावतीने कणबर्गी परिसरात वसाहत योजना राबविण्यासाठी जागेचा ताबा घेतला आहे. मात्र काही शेतकऱयांनी विरोध केला असल्याने ही योजना रखडली होती. पण योजना राबविण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली असल्याने पुढील कार्यवाहीस प्रारंभ करण्यात आला आहे. वसाहत योजनेमध्ये 1600 भूखंड उपलब्ध करण्यात येणार असून मध्यमवर्गीय नागरिकांसाठी लहान आकाराच्या भूखंडाची तरतूद करण्यात येणार आहे. तसेच घरकुल योजनादेखील राबविण्याचा प्रस्ताव आहे. घरकुल योजनेअंतर्गत तीन मजली इमारतीची उभारणी करून 2700 फ्लॅट उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. यामध्ये पाचशे, आठशे आणि एक हजार चौरस फुटाच्या फ्लॅटचा समावेश आहे.
वसाहत योजनेची अंमलबजावणी झाल्यानंतर बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात येणार आहे. पण सदर घरकुलासाठी ग्राहक मिळणे आवश्यक आहे. 2700 फ्लॅटपैकी 500 चौरसफूट आकाराचे 2 हजार फ्लॅट बांधण्यात येणार आहेत. 280 फ्लॅट एक हजार चौरस फुटाचे तर उर्वरित फ्लॅट 800 चौरस फुटाचे बांधण्यात येणार आहेत. यासाठी ग्राहक सर्वेक्षण करण्याची मोहीम बुडाने सुरू केली आहे. याकरिता दि. 15 जूनपासून अर्ज मागविण्यात आले होते. दि. 30 जून शेवटची तारीख असल्याने अर्ज भरण्यासाठी बुधवारी बुडा कार्यालयात मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली होती. मंगळवारी सायंकाळपर्यंत 7 हजारहून अधिक अर्ज बुडाकडे जमा झाले होते. 2 हजारहून अधिक अर्जदारांनी ऑनलाईनद्वारे फ्लॅटसाठी मागणी केली आहे. उर्वरित अर्जदारांनी बुडा कार्यालयात अर्ज केले आहेत. अर्जाची संख्या पाहता तीनपटीने मागणी दिसून येते. सदर मागणीचा अहवाल तयार करून शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर बहुमजली इमारती उभारण्यासाठी कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती बुडा कार्यालयातून उपलब्ध झाली आहे.