लवकरच अवजड वाहतुकीला परवानगी देण्याचे विद्याश्री चंदरगी यांचे आश्वासन
रामनगर / वार्ताहर
बेळगाव-गोवा महामार्गावरील रामनगरपासून अनमोडपर्यंतच्या रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत होते. तसेच रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने दुरुस्तीसाठी डागडुजीचे काम सुरू असून सदर मार्ग जिल्हाधिकाऱयांच्या आदेशानुसार वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र, सद्या या रस्त्याचे दुरुस्तीचे काम पूर्ण होत आल्याने अवजड वाहनांना अनमोड महामार्ग खुला करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यासाठी कारवार असिस्टंट कमिशनर विद्याश्री चंदरगी, जोयडाचे तहसीलदार संजय कांबळे तसेच इतर विविध खात्याच्या अधिकाऱयांनी गुरुवारी रामनगरपासून अनमोडपर्यंत मार्गाची पाहणी केली.
या महामार्गावर अनेक ठिकाणी पडलेले खड्डे योग्य प्रकारे भरण्याबाबत सध्या काम हाती घेतलेल्या ठेकेदाराला सूचना करण्यात आल्या. येत्या वीस दिवसांत अस्तुली ब्रिजसह सर्व मार्गाची डागडुजी करून देण्याचे आश्वासन ठेकेदारांनी दिले.
तसेच या मार्गावरून सद्या लहान वाहने, बस व रुग्णवाहिका जाण्यासाठी रस्ता लवकरच खुला करून देण्याचे विद्याश्री चंदरगी यांच्याकडून आश्वासन देण्यात आले.
अवजड वाहनांनाही लवकरच परवानगी
अवजड वाहनांबाबत विचारले असता सद्या लहान वाहनांना परवानगी देण्यात येणार असून अवजड वाहनांनाही हा महामार्ग वाहतुकीसाठी योग्य असल्याचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच परवानगी देण्यात येईल, असे सांगण्यात आले.