प्रतिनिधी / बेळगाव
सेवा निवृत्तीनंतरही विद्यार्थ्यांशी, समाजाशी जोडलेले रहा, चित्रकारांना चांगले दिवस येणार आहेत. पण त्यासाठी वाचन, चिंतन, मनन करणे आवश्यक आहे. फडके सरांना विद्यार्थ्यांना घडवायची संधी अजूनही आहे. त्याचे त्यांनी सोने करावे, अशा शुभेच्छा बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष किरण ठाकुर यांनी दिल्या.
समिती संचालित जे. एन. भंडारी आर्ट स्कूलचे प्राचार्य जे. बी. फडके यांच्या सेवा निवृत्तीनिमित्त आयोजित निरोप समारंभात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. व्यासपीठावर व्यंगचित्रकार जगदीश कुंटे, भंडारी स्कूलचे नवे प्राचार्य सुभाष देसाई, शिरीष कुलकर्णी, हेरवाडकर स्कूलच्या प्राचार्या वृंदा जिनराळ, मराठी टेनिंग कॉलेजच्या प्राचार्या हेमलता परुळेकर होत्या.
प्रा. सुभाष देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. त्यानंतर जे. बी. फडके यांचा शाल, श्रीफळ, भेटवस्तू, पुष्पगुच्छ व फळांची करंडी देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर उर्मिला सुतार, यमुना पिंगट व ऋतिका गडकरी यांनी सरांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारी भाषणे केली. प्रा. किरण हणमशेट यांनी फडके यांच्या प्रदीर्घ सेवेचा उल्लेख करून त्यांचा गुणगौरव केला.
प्रमुख पाहुणे व्यंगचित्रकार जगदीश कुंटे यांनी फडके सरांच्या स्वभाव वैशिष्टय़ाचा गौरव करून त्यांना नवे उपक्रम हाती घेण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी लोकमान्य सोसायटीचे पुणे येथील समन्वयक भालचंद्र कुंटे यांचेही शुभेच्छापर भाषण झाले.
सर्वांच्या प्रेमाने आपण भारावून गेलो असल्याचा उल्लेख करून जे. बी. फडके यांनी कृतज्ञता व्यक्त केली. प्रतिक सुतार याने आभार प्रदर्शन केले. लोकमान्य सोसायटीचे बेळगाव येथील समन्वयक विनायक जाधव यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी शोभा फडके त्यांच्या दोन्ही कन्या आणि जे. एन. भंडारी आर्ट स्कूलचे विद्यार्थी उपस्थित होते.