तज्ञांच्या समितीचा अहवाल : 29 डिसेंबर रोजी दिल्लीत बैठक
वृत्तसंस्था/ अयोध्या
अयोध्येत श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या पायाची उभारणी आता 1200 भूमिगत स्तंभांऐवजी प्राचीन पद्धतीने होणार आहे. याचा आराखडा निश्चित करण्यासाठी देशाच्या आघाडीच्या 8 तज्ञांच्या समितीने श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला स्वतःचा अहवाल सोपविला आहे. समितीचे अध्यक्षत्व दिल्ली आयआयटीचे माजी संचालक व्ही.एस. राजू करत आहेत.
अहवालात वाइब्रोस्टोन कॉलम आणि कंटीन्यूअस राफ्ट स्टोन तंत्रज्ञान पद्धतीने पाया निर्माण करण्याची सूचना आहे. दोन्ही पद्धती व्यवहार्य आणि उच्च गुणवत्तेच्या आहेत. भूमिगत स्तंभांसंबंधी करण्यात आलेले अध्ययनही व्यर्थ गेलेले नाही. त्याच्यामुळे पायाला स्थैर्य देण्यास मदत होणार असल्याचे उद्गार ट्रस्टच्या निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांनी काढले आहेत. 29 डिसेंबर रोजी दिल्लीत होणाऱया बैठकीत सूचनांचा विचार करून निर्णय घेतला जाणार आहे. भव्य मंदिराकरता तडजोड केली जाणार नसल्याचे ट्रस्टचे खजिनदार गोविंददेव गिरी यांनी सांगितले आहे.
वाइब्रोस्टोन कॉलम तंत्रज्ञान
या तंत्रज्ञानात खोल जमिनीतून दगडांचा कॉलम एका विशेष रचनेत पृष्ठभागापर्यंत आणला जातो. पृष्ठभाग मजबुतीसह भूकंप आणि भूजलापासूनही सुरक्षित राहू शकेल अशाप्रकारचे बळ पुरविले जाते. त्यावर राफ्ट तयार केला जातो.
कंटीन्यूअस राफ्ट स्टोन तंत्रज्ञान
या तंत्रज्ञानात एका निश्चित खोलीपर्यंत खोदकाम करण्यात येते, त्यानंतर दगड, वाळू आणि चुन्याचे आच्छादन करण्यात येते. प्रत्येक स्तराला निश्चित पद्धतीने दबाव टाकून स्थिरता आणि बळकटी दिली जाते. त्यावर व्यासपीठ तयार करून मंदिराची निर्मिती करण्यात येते.
प्राचीन काळात वापर
वाइब्रोस्टोन कॉलम आणि कंटीन्यूअस स्टोन तंत्रज्ञानाद्वारेच प्राचीन काळात दगडांनी मोठी मंदिरे, किल्ले आणि महालांचा पाया रचला जात होता. आता आधुनिक यंत्रांद्वारेही याच तंत्रज्ञानाच्या मदतीने पाया तयार केला जाऊ शकतो, असे उद्गार अभियंते स्नेहल पटेल यांनी काढले आहेत. सद्यकाळात धरणे आणि अन्य विशाल इमारतींच्या पायाला मजबूत करण्यासाठीही याचा वापर होत आहे.