अजूनही 60 रुग्णांचा जीव धोक्यात, दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयातील घटनेने हळहळ
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशातील कोरोना संक्रमणाची परिस्थिती अत्यंत भयानक बनली असून राजधानी दिल्लीतील अनेक रुग्णालयांनाही ऑक्सिजन सिलिंडरची चणचण जाणवत आहे. दिल्लीतील सुप्रसिद्ध सर गंगाराम रुग्णालयालाही याचा मोठा फटका बसला आहे. या रुग्णालयात उपचार घेणाऱया 25 रुग्णांचा गेल्या चोवीस तासांमध्ये प्राणवायूअभावी मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या घटनेची गंभीर दखल घेत रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी पूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
गेल्या महिन्याभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण आला आहे. विविध इस्पितळांमधील रुग्ण वाढल्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडाही जाणवू लागला आहे. प्राणवायूअभावी अनेक रुग्णांचा जीव धोक्मयात आल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात गंभीर स्थितीत असलेल्या 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ऑक्सिजनच्या अभावी या रुग्णांना आपला जीव गमवावा लागल्याचे इस्पितळ प्रशासनाकडूनच शुक्रवारी जाहीर करण्यात आल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 60 रुग्णांचा जीव धोक्मयात असल्याचेही सांगण्यात येत आहे.
रुग्णालयाला सध्या ऑक्सिजन पुरवठा अल्प होत आहे. व्हेन्टिलेटर आणि बीआयपीएपी मशीनही प्रभावीपणे काम करत नाहीत. त्यामुळे गंभीर स्थितीत असलेल्या अनेक रुग्णांचा जीव धोक्मयात आला आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱयाने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर दिली.
अन्य इस्पितळांमध्येही ‘आणीबाणी’ची स्थिती
दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात गुरुवारी एक आणीबाणीचा प्रसंग निर्माण होऊन ऑक्सिजनच्या पुरवठय़ात तुटवडा निर्माण झाला. ऑक्सिजनअभावी 500 रुग्णांचा जीव धोक्मयात आला होता. पण वेळेत ऑक्सिजन टँकर पोहोचल्यामुळे या सर्व रुग्णांचा जीव वाचला होता. ही घटना ताजी असतानाच आज सर गंगाराम रुग्णालयात दुर्दैवी घटना घडल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
आरोग्य व्यवस्थेवर ताण
दिल्लीत दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. दिल्लीत गुरुवारी 26 हजार 169 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे तर 306 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दहा दिवसात दिल्लीत 1,750 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. वाढत्या बाधितांमुळे दिल्लीतील आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला असून बेड्स आणि ऑक्सिजनचा तुटवडा पडत असल्याचे दिसून येत आहे.