प्रतिनिधी / रत्नागिरी :
रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी शिक्षक नेते दिलीप देवळेकर यांची बिनविरोध निवड झाली. पतसंस्थेवर सध्या महायुतीचे वर्चस्व आहे. निवड झाल्यानंतर देवळेकर यांनी शिक्षकांच्या प्रश्नासाठी सर्व संघटनांना एका झेंडय़ाखाली आणून समन्वय साधण्यासाठी कसे आणता येईल यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याचा मनोदय व्यक्त केला.
शिक्षक संघटनांनी एकत्रीत येऊन निर्माण केलेल्या महायुतीने पतसंस्थेवर वर्चस्व निर्माण केले होते. यामध्ये प्राथमिक शिक्षक संघ, पदवीधर शिक्षक संघटना, कास्ट्राईब संघटना, उर्दू संघटना, अखिल भारतीय शिक्षक संघटना अशा विविध संघटना एकवटल्या होत्या. चार वर्षांपुर्वी विद्यमान पदाधिकार्यांना बाजूला सारुन वर्चस्व प्रस्थापित केले हाते. महायुतीमधील प्रत्येक संघटनेच्या प्रतिनिधींना अध्यक्षपदाची संधी मिळवून देण्याचे ठरले होते. त्यानुसार चौथ्या टर्मला शिक्षक संघातर्फे दिलीप देवळेकर यांना संधी दिली गेली.
गुरुवारी 10 सप्टेंबर रोजी सकाळी झालेल्या निवडणुकीत देवळेकर यांचा एकमेव अर्ज होता. त्यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी विविध शिक्षक संघटनाचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष उपस्थित होते. यामध्ये विकास नलावडे, बबन बांडागळे, बळीराम मोरे, संतोष कांबळे, भगवान मोटे, चंद्रकांत पावसकर, अहमद मुल्ला यांच्यासह अनेकांचा सहभाग होता. देवळेकर यांची निवड झाल्यानंतर उपस्थितांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. याप्रसंगी जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती रुतजा जाधव यांनी उपस्थित राहून अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. देवळेकर यांनी संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्यस्तरावर प्रयत्न केले आहेत. त्यामुळे पतसंस्थेचा कारभार ते योग्य पध्दतीने हाकतील असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
सर्वच शिक्षकांचे प्रश्न सारखे आहेत. त्यांच्यासाठी सर्व संघटनांनी एकत्रीतपणे लढल्या तर त्याचा फायदा होऊ शकेल. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन भविष्यात होणार्या पतसंस्थेची निवडणुक बिनविरोध करण्याचा प्रयत्न राहील. त्यादृष्टीने पावले उचलुया, असे देवळेकर यांनी सांगितले