किरण ठाकुर यांनी वाहिली श्रद्धांजली
प्रतिनिधी /पणजी
प्रा. गोपाळराव मयेकर सर म्हणजे विद्वत्तेचे साक्षात दर्शन. संतसाहित्य, ज्ञानेश्वरी, स्वामी विवेकानंद अशा अनेक विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान, प्रवचने देण्यात त्यांचा हातखंडा होता. ज्ञानेश्वरी, पसायदान विषयावरती हजारोच्या संख्येने त्यांनी व्याख्यान देऊन संतसाहित्याची लोकप्रियता वाढवली. बेळगावातही आपण तीन चारदा त्यांची व्याख्याने आयोजित केल्याचे किरण ठाकुर यांनी सांगितले.
ज्ञानेश्वरी हा त्यांच्या जगण्याचा श्वोसोच्छवास होता. ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे या साने गुरुजींच्या कवितेचे दर्शन मयेकर सरांमध्ये होई. लहान-मोठा कोणताही भेदाभेद न करता सर्वांशी प्रेमाने वागणारे सह्रदयी अंतःकरणाचे मयेकर सर म्हणजे नमस्काराची जागा. मयेकर सरांच्या निधनाने नमस्काराचे पाय हरवले आहेत, अशा शब्दात तरुण भारतचे समूह प्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर यांनी मयेकर सरांच्या तसबिरीला पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांच्यासमवेत लोकमान्य परिवाराचे अतिथी संपादक डॉ. गोविंद काळे उपस्थित होते.