वार्ताहर/ राजापूर
वादळी वाऱयासह झालेल्या पावसात प्रिंदावण मानवाडी येथे फणसाचे झाड अंगावर कोसळल्याने शिल्पा शंकर धुरी (45) यांचा जागीच मृत्यू झाला. पावसाचा हा जिल्हय़ातील पहिलाच बळी ठरला आहे.
प्रिंदावणमधील मानवाडीत सोसाटय़ाच्या वाऱयामुळे आवारातील फणसाचे झाड मुळासकट उन्मळून पडले. हे झाड शिल्पा शंकर धुरी यांच्या अंगावर पडून त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती महसुल प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.
त्याचप्रमाणे दोनिवडे येथील संतोश कुळये यांचा एक बैल वहाळाला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली. तसेच कुंभवडे येथील राजाराम शांताराम बाणे यांच्या घरावर सागाचे झाड पडून तर एकनाथ शंकर बाणे यांच्या गोठय़ावर झाड कोसळून अंशत नुकसान झाले. जुवाटी येथे नंदकिशोर राजाराम मयेकर यांच्या घरावर झाड कोसळले. डोंगर येथे संरक्षक भिंत कोसळली आहे. दत्तवाडीत एका घरावर झाड कोसळून अंशत नुकसान झाले आहे.