प्रतिनिधी / कोल्हापूर
प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डींग हाऊसचे चेअरमन व पेठवडगाव नगरपरिषदेचे माजी नगरसेवक प्राचार्य रंगराव दत्तू उर्फ आर. डी. पाटील वडगावकर (वय. 76) यांचे गुरूवारी कोल्हापूरातील एका खाजगी रूग्णालयात उपचारा दरम्यान हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे पार्थिव संस्थेच्या कार्यालयासमोर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यांच्यावर गुरूवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने राजकारण, समाजकारण आणि शिक्षण क्षेत्रातील जाणकार व्यक्तिमत्व हरपल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.
प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डींग हाऊसचे चेअरमन आर. डी. पाटील वडगावकर यांचे मूळ गाव हातकणंगले तालुक्यातील भादोले आहे. शिक्षणतज्ञ डी. बी. पाटील यांचे निधन झाल्यानंतर प्रशासनाचा मोठा अनुभव असल्याने वडगावकर यांनी 19 नोव्हेंबर 2019 रोजी प्रिन्स मराठा बोर्डींग हाऊसच्या चेअरमन पदाची सुत्रे स्विकारली होते.
पेठवडगाव येथील बळवंतराव यादव हास्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये ते 30 वर्षे प्राचार्य म्हणून कार्यरत होते. 1991 ते 2001 या कालावधीत ते वडगाव नगर परिषदेचे नगरसेवक म्हणून कार्यरत होते. 1997 ते 2003 पर्यंत ते कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे चेअरमन होते. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक कार्यात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. त्यांच्या जाण्याने शिक्षण क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.