अंतिम अरदासमध्ये पोहोचल्यावर झाला विरोध ः ठिकठिकाणी होर्डिंग
वृत्तसंस्था/ लखीमपूर खीरी
उत्तरप्रदेशच्या लखीमपूर खीरीमध्ये मृत शेतकऱयांच्या अंतिम अरदासमध्ये सामील होण्यासाठी पोहोचलेल्या प्रियंका वड्रा यांना ठिकठिकाणी विरोधाला तोंड द्यावे लागले आहे. लखनौपासून लखीमपूरपर्यंत त्यांच्या विरोधात होर्डिंग झळकले आहेत. तर लखीमपूर खीरीमध्ये त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखविण्यात आले.
मृत शेतकऱयांच्या अंतिम अरदासमध्ये शेतकरी नेते राकेश टिकैत समवेत देशभरातून शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी सामील झाले. या ठिकाणी पोहोचण्याची घोषणा प्रियंका यांनी केली होती. प्रियंका यांनी परत जावे अशा घोषणा काही लोकांकडून देण्यात आल्या आहेत.
तर होर्डिंगवर 1984 च्या दंगलीस जबाबदार लोकांच्या खोटय़ा सहानुभूतीची आवश्यकता नाही आणि 1984 च्या दंगलीत शिखांचे शिरकाण करणाऱयांनी आता जखमांवर मीठ चोळू नये असा उल्लेख आहे. तसेच अंतिम अरदासाच्या कार्यक्रमात पोहोचलेल्या प्रियंका वड्रा यांना व्यासपीठावरून बोलण्याची अनुमती देण्यात आलेली नाही.