नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
सध्या महाराष्ट्रातील राजकारण रेमडेसिविरच्या साठेबाजीवरून चांगलेच तापले आहे. मुंबई पोलिसांनी ब्रुक फार्माच्या संचालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते मध्यरात्रीच पोलीस स्टेशनमध्ये पोलीस ठाण्यात पोहचले. पोलिसांनी यावेळी त्यांना फक्त चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचं सांगितलं. आता याप्रकरणावरून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता टीका केली आहे. त्यांनी भाजप नेत्याचं रेमडेसिवीर साठवून ठेवण्याचं कृत्य हे मानवतेच्या विरोधात गुन्हा असल्याचे म्हटले आहे.
प्रियांका गांधी यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, जेव्हा देशातील कानाकोपऱ्यात रेमडेसिवीर उपलब्ध व्हावं म्हणून लोक वणवण करत आहेत. तसेच जीव वाचवण्यासाठी रेमडेसिवीर शोधण्यासाठी रुग्णांचे ससेहोलपट सुरु आहे. त्याचवेळी जबाबदार पदावर राहिलेल्या भाजप नेत्यांचं रेमडेसिवीर साठवून ठेवण्याचं कृत्य हे मानवतेच्या विरोधात गुन्हा आहे. यासोबतच प्रियांका गांधी यांनी एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस व काही भाजप नेते दिसत आहेत.
प्रियांका गांधी यांच्याप्रमाणे काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी देखील रेमडेसिवीर खरेदी प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांच्या चौकशीची मागणी केली आहे. यासोबतच त्यांनी ही घटना लाजिरवणी असल्याचे देखील म्हटले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.