अनेक चित्रपटकलाकारांना कित्येकदा बॉडीशेमिंगला तोंड द्यावे लागले. सोशल मीडियावर अनेक लोक त्यांचे वजन आणि रंगावरून थट्टा करत असतात. पण हे कलाकार अशा ट्रोलर्सना चोख प्रत्युत्तर देत असतात. याचदरम्यान अभिनेत्री प्रियामणिने बॉडी शेमिंगवरून स्वतःचे दुःख व्यक्त केले आहे. लोक मला काळी, जाडी आणि आंटी म्हणून हाक मारायचे असे तिने म्हटले आहे.
प्रियामणि सध्या द फॅमिली मॅनच्या दुसऱया सीझनमुळे अत्यंत चर्चेत आहे. या सीरिजमध्ये तिने अभिनेता मनोज वाजपेयीच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. प्रेक्षकांची तिच्या व्यक्तिरेखेला मोठी पसंती मिळाली आहे. प्रियामणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील गाजलेली अभिनेत्री आहे.
माझे वजन 65 किलो असताना लोक मला जाडी म्हणत असत. जाड-बारीक असण्याबद्दल प्रत्येक माणसाचा वेगळा विचार असतो. एखाद्याला जाड ठरवून बॉडी शेमिंग का करायचे? मला माझ्या त्वचेच्या रंगावरूनही ट्रोल व्हावे लागले आहे. मी काळी का दिसते असे लोक विचारायचे? कुणालाच काळा म्हणून हाक मारू नका, कारण काळय़ा त्वचेचा माणूस सुंदर असतो असे तिने म्हटले आहे.