संदीप निगळय़े यांनी फोडला प्रचाराचा नारळ : भाजपाने उमेदवारी नाकारल्यास स्वतंत्र लढणार
वार्ताहर /म्हार्दोळ
गेली पंधरा वर्षे मडकईतील उमेदवार प्रियोळ मतदार संघाचे प्रतिनिधीत्त्व करीत आहेत. यापुढे हे घडणार नाही. प्रियोळातील स्थानिक उमेदवारच विधानसभेत जाणार असून स्वाभिमानी मतदार हे परिवर्तन घडवून आणतील. भाजपाच्या उमेदवारीवर आमचा दावा आहे. भाजपाकडून उमेदवारी नाकारली गेल्यास, आम्ही स्वाभिमानी प्रियोळकर म्हणून ही निवडणूक लढवू आणि विजयी होऊ अशी घोषणा संदीप निगळय़े यांच्या म्हार्दोळ येथील प्रचारसभेत करण्यात आली.
स्वामिमानी प्रियोळकर या बॅनरखाली उद्योजक संदीप निगळय़े यांनी रविवारी दुपारी म्हार्दोळ येथील श्री महालसा देवीचे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी त्यांचे कार्यकर्ते व समर्थक मोठय़ासंख्येने उपस्थित होते. श्री महालसा देवी व अन्य देवतांचे आशिर्वाद घेतल्यानंतर म्हार्दोळ येथील मैदानावर जाहीर सभा झाली. सभेनंतर म्हार्दोळ बाजारात संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
संदीप निगळय़े यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह म्हार्दोळ पंचायत सभागृहापासून महालसा मंदिरापर्यंत भव्य मिरवणूक काढली. त्यात युवा व महिला कार्यकर्त्यांसह अन्य समर्थक मोठय़ासंख्येने सहभागी झाले होते.
भाजपाने उमेदवारी न दिल्यास स्वतंत्र लढू
यावेळी प्रसार माध्यमांसमोर बोलताना संदीप निगळय़े म्हणाले, मागील दीड महिना आम्ही ‘घर घर चलो’ अभियान राबविले. त्याला मतदारांकडून उत्स्फूर्त पाठिंबा लाभाला. मतदारांच्या भेटी दरम्यान अनेक लोकवस्तीपर्यंत अद्याप पायवाट व इतर प्राथमिक सुविधाही पोचलेल्या नाहीत, हे लक्षात आले. या प्राथमिक गरजा आधी पुरवा अशी प्रियोळच्या जनतेची मागणी आहे. आपण स्वयंघोषित उमेदवार नसून प्रियोळच्या जनतेचा उमेदवार आहे. भाजपासाठी गेली वीस वर्षे आपण काम करीत आहे. त्यामुळे भाजपाने आपल्याला उमेदवारी द्यावी. भाजपाकडून उमेदवारी नाकारली गेल्यास निवडणूक लढविणारच असे संदीप निगळय़े यांनी स्पष्ट केले.
म्हार्दोळ मैदानावर झालेल्या जाहीर सभेत वेरे-वाघुर्मे पंचायतीच्या उपसरपंच रुपा नाईक, प्रियोळ भाजपा मंडळाचे अध्यक्ष महेश शिलकर, माजी अध्यक्ष सतीश मडकईकर, गजानन प्रभूगावकर, विनय गावकर यांच्यासह वळवई पंचायतीचे पंचसदस्य निळकंठ नाईक, प्रियोळचे माजी सरपंच काशिनाथ गावडे, दीपक नाईक, संजय नाईक, प्रेमानंद नाईक, युवा कार्यकर्ते गौरेश गावडे यांची भाषणे झाली. त्यांनी प्रियोळात आता परिवर्तनाही गरज असल्याचे सांगितले. स्वाभिमानी प्रियोळकरांनी धमकी, दबावतंत्र किंवा कुठल्याही आमिषांना बळी न पडता संदीप निगळय़े या स्थानिक उमेदवारालाच पुढील आमदार म्हणून निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.
केरीतून इतिहास घडणार : महेश शिलकर
प्रियोळ मतदार संघात मागील पंधरा वर्षे मडकईतील आयात उमेदवार आमदार बनले. आता ही प्रथा बदलण्याची वेळ आली आहे. पंधरा वर्षापूर्वी केरी गावातील ऍड. विश्वास सतरकर हे आमदार होते. त्याच केरी गावातून संदीप निगळय़े हे स्थानिकांचे उमेदवार म्हणून पुढे आले आहेत. प्रियोळात यंदा इतिहास घडणार व तो केरीतून घडणार असल्याचे महेश शिलकर म्हणाले.
जाहीर सभेनंतर संदीप निगळय़े यांचे वडिल निळकंठ निगळय़े यांच्याहस्ते संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सौ. प्रतिभा संदीप निगळय़े व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.