चकवा देणाऱया निकालाची शक्यता
प्रतिनिधी /फोंडा
प्रियोळ मतदार संघात एकूण आठ उमेदवार रिंगणात असले तरी भाजपा, मगो व अपक्ष या तिघांमध्येच अटीतटीची लढत झाल्याची चर्चा सध्या मतदारांमध्ये सुरु आहे. काही उमेदवारांचे समर्थक मोठय़ा मताधिक्क्याने विजयी होण्याचा दावा करीत असले तरी ही शक्यता खूप कमी दिसते. तिघांपैकी जो कोणी विजयी होईल, तो अवघ्या काही मतांच्या फरकानेच, असे एकंदरीत प्रियोळातील चित्र आहे.
मागील निवडणुकीत मगो उमेदवार दीपक ढवळीकर विरुद्ध अपक्ष उमेदवार गोविंद गावडे अशी थेट लढत होती. त्यातही भाजपाने आपला उमेदवार उभा न करता गोविंद गावडे यांच्या बाजूने पूर्ण ताकद लावली होती. त्यामुळे मतदानापूर्वीच निकालाचे स्पष्ट संकेत मिळत होते. यंदा गोविंद गावडे हे भाजपातर्फे लढत असले तरी त्यांना अँटी इनकंम्बसिचा धोका अधिक आहे. दोन वेळा आमदार असलेले मगोचे दीपक ढवळीकर व भाजपाच्या एका गटाचे उमेदवार म्हणून अपक्ष लढणारे संदीप निगळय़े अशा दोन आघाडय़ांवर गोविंद गावडे यांच्यासमोर आव्हान होते. भाजपाचा एक गट फुटून त्यांनी संदीप निगळय़े यांना स्वतंत्र उमेदवार म्हणून उभा केल्याने भाजपाची मते विभागण्याची शक्यता अधिक आहे. ही मत विभागणी दीपक ढवळीकर यांच्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते. मात्र गोविंद गावडे यांचे समर्थक ही शक्यता नाकारतात. तशी मतविभागणी झाल्यास ती दीपक ढवळीकर यांच्या मतांवर परिणाम करणारी आहे, असा त्यांचा दावा आहे. संदीप निगळय़े हे किमान 9 हजार मतांचा आकडा ओलांडतील असे निगळय़े समर्थक ठामपणे सांगतात. शिवाय दीपक ढवळीकर व गोविंद गावडे यांचे राजकारण प्रियोळच्या मतदारांनी पाहिले आहे. त्यामुळे स्थानिक उमेदवार म्हणून यावेळी मतदार निगळय़े यांनाच संधी देतील असेही त्यांना वाटते. संदीप निगळय़े यांची मते ही बहुतेक भाजपाची असल्याने त्याचा फायदा मगोला होईल व दीपक ढवळीकर आरामात निवडून येतील अशी खात्री ढवळीकरांच्या समर्थकांना वाटते.
एकंदर चित्र पाहिल्यास प्रियोळातील मतदार सायलंट आहे. तिघांपैकी जो कोणी विजयी होणार तो खूप मोठय़ा मताधिक्क्यापेक्षा अवघ्या काही मतांनीच बाजी मारण्याची शक्यता अधिक दिसते. गोविंद गावडे यांच्या कार्यकर्त्यांना मागील पाच वर्षे प्रियोळात झालेल्या विकासाची नोंद घेऊन मतदार पुन्हा संधी देतील असे वाटते. तर संदीप निगळय़े यांना प्रियोळातील दबावातंत्राच्या राजकारणा विरोधात मतदार कौल देणार असून नवीन चेहरा म्हणून आपल्याला संधी मिळणार असा विश्वास वाटतो. त्यामुळे 9 हजार मतांचा आकडा आपण सहज पार करू असा त्यांचा एकंदरीत कल दिसतो.
गोविंद गावडेंच्या समर्थकांनी मागील निवडणुकीपेक्षा अधिक मोठय़ा मताधिक्क्याने विजयाचा दावा केला आहे. मागील निवडणुकीत त्यांना 4,600 मतांची आघाडी मिळाली होती. दीपक ढवळीकर यांना गेल्या वेळी दहा हजार मते मिळाली होती. ही मते अधिक भाजपाच्या दोन गटात विभागणाऱया मतांवर त्यांनी आपल्या बेरजेचे गणित मांडले आहे. या निकालाची तुलना वर्षभरापूर्वी झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीशी करायची झाल्यास प्रियोळ मतदारसंघातील दोन पैकी एक जागा मगो पक्षाने जिंकली होती. शिवाय ज्या तिवरे वरगांव जिल्हा पंचायत क्षेत्रात भाजपाचे उमेदवार विजयी झाले ते अवघ्या दीडशे मतांच्या फरकाने जेमतेम काठावर जिंकले होते. कुर्टी जिल्हा पंचायतीच्या जागेवरही विजयी झालेल्या मगोच्या उमेदवाराने सावईवेरे पंचायत क्षेत्रात भाजपाच्यापेक्षा जास्त मतांची आघाडी घेतली होती. त्यामुळे मगो पक्षाचा प्रभाव बऱयापैकी आहे हे नाकारता येत नाही. प्रियोळ मतदारसंघातील सातही पंचायतीमध्ये मगो व भाजपाचे मतदार मोठय़ा प्रमाणात आहेत. संदीप निगळय़े हे नवीन खेळाडू असल्याने ते नेमके कसे खेळतील याचा अंदाज सध्यातरी बांधता येणार नाही. दोन्ही प्रतिस्पर्ध्यांनी मात्र ते जेमतेम चार हजार मते मिळवतील असा अंदाज बांधलेला आहे.
प्रियोळात सध्या गोविंद गावडे व दीपक ढवळीकर यांच्या नावाचीच चर्चा असली तरी या तिरंगी अटीतटीच्या लढतीत धक्कादायक व चकवा देणारा निकालही लागू शकतो.