वार्ताहर /माशेल
प्रियोळ मतदारसंघात कित्येक प्राथमिक शाळा मोडकळीस आल्या होत्या, संस्कृतीच्या रक्षणासाठी ग्रामिण भागातील सरकारी मराठी शाळा टिकल्या पाहिजेत. प्राथमिक शाळाचे वातावरण विद्यार्थ्यांना पोषक करण्यावर आपला भर राहिल असे प्रतिपादन कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी केले.
खेडे प्रियोळ येथील प्राथमिक शाळेच्या संरक्षण भिंत, व शाळेच्या स्वच्छतागृहाच्या कामास नारळ वाढवून सुरूवात केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी त्याच्यासमवेत वेलिंग प्रियोळचे सरपंच मंगेश गावडे, माजी सरपंच लक्ष्मीकांत खेडेकर, पंच हर्षा गावडे, रोहिणी तसेच एसटीचे दुर्गादास गावडे, संदीप गावडे उपस्थित होते.
खेडे प्राथमिकची पटसंख्या पोचली 22 वर
ते पुढे बोलताना म्हणाले की काही शाळांचे दुरूस्तीकाम केले तर कित्येक ठिकाणी नवीन शाळाही सर्वसोयीनुसार बांधून दिल्या आहे. उर्वरीत शाळाचे काम हाती घेतले असून तेही या काही महिन्यात पुर्ण होणार आहेत. खेडे येथील प्राथमिक शाळेत अवघ्या हातावरच्या बोटावर मोजण्यासारखी पटसंख्या होती, आता येथील सरपंच, पंच्। पालक शिक्षक संघटनेच्या प्रयत्नामुळे ती पटसंख्या 22 वर आली आहे यापुढेही ती वाढणार असून या शाळेसमोर विद्यार्थ्यांना मैदान व व्यवस्थित स्वच्छतागृहाची व्यवस्था केलेली आहे. सुमारे पंधरा लाख रूपये खर्चुन ही कामे शिक्षण खात्यातर्फे करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रियोळ मतदारसंघाचा विकास हेच माझे मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शाळेच्या शिक्षकांनी स्वागत केले. मंगेश गावडे सरपंच यांनी मंत्री गोविंद गावडे यांच्या विकासकामासंबंधी कौतुगोद्गार काढले.