अध्यक्षांसह दीडशे प्रमुख कार्यकर्त्यांचा सामूहिक राजीनामा.गोविंद गावडेंच्या भाजपा प्रवेशाचा निषेध : संदीप निगळय़े हेच आमचे उमेदवार
प्रतिनिधी /फोंडा
अपक्ष आमदार व मंत्री गोविंद गावडे यांना भाजपात प्रवेश दिल्याने या घटनेचा जाहीररित्या निषेध करीत, प्रियोळ भाजप मंडळाच्या अध्यक्षांसह साधारण दीडशे प्रमुख कार्यकर्त्यांनी पक्षाचा सामुहिक राजीनामा दिला. पक्षाची विचारधारा किंवा तत्वांशी दुरान्वयेही संबंध नसलेला उमेदवार आम्हाला कदापी मान्य नाही. गेली पंधरा वर्षे पक्षाशी एकनिष्ठ असलेले संदीप निगळय़े हेच प्रियोळातील आमचे उमेदवार आहेत. आम्ही सर्व जुने कार्यकर्ते एकदिलाने व एकजुटीने त्यांच्या विजयासाठी लढणार असल्याची घोषणा फोंडा येथे पत्रकार परिषदेत करण्यात आली.
यावेळी प्रियोळ भाजप मंडळाचे अध्यक्ष महेश शिलकर, संदीप निगळय़े, माजी अध्यक्ष सतीश मडकईकर, शिवाजी गावडे, गजानन प्रभुगावकर यांच्यासह भाजपचे आजी-माजी पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. प्रदेश भाजपने प्रियोळातील निष्ठावान कार्यकर्त्यांवर पक्षाची विचारसरणी व लागंबांधे नसलेला उमेदवार लादल्याबद्दल महेश शिलकर यांनी जाहीर निषेध केला. प्रियोळातील कार्यकर्त्यांनी मोठय़ा कष्टाने पक्ष तळागाळात रुजविला. अनेक राष्ट्रीय व स्थानिक आंदोलनामध्ये पोलिसांच्या लाठय़ाही झेलल्या. आज या प्रमाणिक कार्यकर्त्याची कुठलीच कदर राहिलेली नाही. पक्षाच्या वरिष्ठांनी कार्यकर्त्यांचा विश्वासघात केला असून हा अन्याय कदापी खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
कार्यकर्त्यांची कदर करणारा तो भाजप कुठे आहे… ?
सन 2012 च्या निवडणूकीत मगोसाठी व 2017 मध्ये अपक्ष उमेदवारासाठी आम्ही तडजोड केली. पंधरा वर्षे पक्षाबाहेरील उमेदवाराला पाठींबा दिला. येणाऱया निवडणूकीत आम्हाला पक्षातील व प्रियोळातील उमेदवार द्यावा असा आमचा दावा होता. मात्र गोविंद गावडे यांना भाजपात प्रवेश देऊन प्रदेश भाजपाने कार्यकर्त्यांची कदर नसल्याचेच दाखवून दिले आहे. त्याला चोख उत्तर म्हणून संदीप निगळय़े यांना स्वाभिमानी प्रियोळकर म्हणून निवडून आणण्याचा आमचाही ठाम निर्णय असल्याचे शिलकर यांनी सांगितले. स्व. मनोहर पर्रीकर यांच्या कार्यकाळात कार्यकर्त्यांची कदर करणारा तो भाजप आज अस्तित्वात राहिलेला नाही. केवळ प्रियोळातच नव्हे संपूर्ण गोव्यातील भाजपा कार्यकर्ते हा कटू अनुभव घेत आहेत. प्रदेश भाजपाने संघाच्या या मूळ भाजपाच्या विचारधारेलाच हरताळ फासला आहे. ‘नेशन फर्स्ट’ ही भाजपाची विचारधारा आहे. गोव्यातील भाजप मात्र ‘कमिशन फर्स्ट’ची भाषा बोलत आहे. सन 2017 साली ज्या भाजपाच्या पाठींब्यावर गोविंद गावडे निवडून आले, त्यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांचे पद्धतशीरपणे खच्चीकरण केल्याचा आरोपही त्यांनी केला.
पंधरा वर्षे इतरांसाठी झटलो, आता आमच्यासाठी लढू : संदीप निगळय़े
संदीप निगळय़े म्हणाले, मागील दोन निवडणुका भाजपाचे कार्यकर्ते इतर पक्षातील उमेदवारांसाठी राबले. मात्र निवडून येताच या आमदारांनी भाजपा कार्यकर्त्यांना पद्धतशीरपणे बाजूला केले. त्यामुळे यापुढे स्थानिक उमेदवारालाच पक्षाने तिकीट द्यावी ही आमची सातत्याने मागणी होती. प्रदेश भाजपने ती डावलली आहे. गेली पंधरा वर्षे प्रियोळात आमदार नसताना कार्यकर्त्यांनीच पक्ष सांभाळला व आज ‘हेची फळ मम तपाला’ असा आक्रोश करण्याची वेळ कार्यकर्त्यांवर आली आहे. हा अन्याय आम्ही कदापी सहन करणार नाही. प्रियोळची जनता सुजाण असून यावेळी निश्चितच ती आमच्या पाठिशी राहील. आमच्या या लढय़ात कुणी पाठींबा दिला तर आम्ही तो अवश्य घेऊ असे त्यांनी जाहीर केले.
90 टक्के कार्यकर्ते आमच्यासोबत
प्रियोळातील भाजप कार्यकर्त्यांनी एकदिलाने व एकजुटीने लढण्याचा निर्णय घेतला असून 90 टक्के कार्यकर्ते आमच्यासोबत असल्याचे शिवाजी गावडे, गजानन प्रभुगावकर व सतीश मडकईकर यांनी सांगितले. आता कुठल्याच परिस्थितीत माघार नाही. संदीप निगळय़े हाच आमचा उमेदवार असून त्यांच्या विजयासाठी अहोरात्र झटण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखविला.