दोन्ही संघात अव्वल विस्फोटक फलंदाज असल्याने धावांची आतषबाजी अपेक्षित
मुंबई / वृत्तसंस्था
केएल राहुलच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्सचा संघ आज संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सचा सामना करेल, त्यावेळी दोन्ही संघात असलेल्या अव्वल विस्फोटक फलंदाजांमुळे धावांची आतषबाजी होण्याची शक्यता अधिक असेल. प्रीती व शिल्पाचे संघ यानिमित्ताने आमनेसामने भिडणार असून दोन्ही संघांचा विजयी सलामी देण्याचा प्रयत्न असेल. सायंकाळी 7.30 वाजता या लढतीला सुरुवात होणार आहे.
राजस्थानची भिस्त प्रामुख्याने अष्टपैलू बेन स्टोक्सवर असणार आहे. याशिवाय, आणखी एक इंग्लिशमन जोस बटलर व नव्याने नियुक्त कर्णधार सॅमसन मोठी खेळी उभारु शकतात. राजस्थानचा संघ येथे यशस्वी जैस्वाल-बटलरला सलामीला उतरवण्याचे संकेत आहेत. स्टोक्स, सॅमसन मध्यफळीत खेळतील. या चौघांनी जोरदार आतषबाजी केली तर राजस्थानला मोठी धावसंख्या उभारण्यात काहीच अडचण येणार नाही.
वानखेडेची खेळपट्टी फलंदाजीला पोषक असल्याने दोन्ही संघातील बिग हिटर्स फलंदाजांसाठी ही जमेची बाजू असेल. रॉयल्सकडे याशिवाय, अष्टपैलू शिवम दुबे, श्रेयस गोपाल, राहुल तेवातिया, रियान पराग व लियाम लिव्हिंगस्टोन यांचीही साथ असणार आहे.
यापैकी, गोपाल, तेवातिया, पराग हे लेगस्पिनर आहेत. त्यामुळे, यापैकी दोघे कोण खेळतील, याची उत्सुकता असेल. तेवातिया व दुबे यांनी चौफेर फटकेबाजीची आपली क्षमता यापूर्वीच दाखवून दिली आहे. त्यामुळे, त्यांचे अंतिम एकादशमधील स्थान जवळपास निश्चित मानले जाते. जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे बाहेर फेकला गेला असल्याने गोलंदाजीची मुख्य धुरा मात्र ख्रिस मॉरिसकडे असणार आहे. दक्षिण आफ्रिकन ख्रिस मॉरिसला राजस्थानने 16.25 कोटीची रक्कम मोजत करारबद्ध केले आहे. ती सार्थ ठरवण्याचे आव्हान मॉरिससमोर असेल.
पंजाबच्या गोलंदाजीची धुरा शमीकडे
पंजाब किंग्स संघाच्या गोलंदाजीची मुख्य धुरा मोहम्मद शमीकडे असणार आहे. फलंदाजीत केएल राहुल, मयांक, ख्रिस गेल, डेव्हिड मलान, नवोदित एम. शाहरुख खान असल्याने त्यांना फारशी चिंता नाही. गोलंदाजीत मागील हंगामात शमी धारदार ठरला होता. यंदा त्याला झाय रिचडर्सन, रिले मेरेडिथ, ख्रिस जॉर्डन यांची साथ लाभेल.
प्रतिस्पर्धी संघ
राजस्थान रॉयल्स ः संजू सॅमसन (कर्णधार व यष्टीरक्षक), जोस बटलर (यष्टीरक्षक), बेन स्टोक्स, यशस्वी जैस्वाल, मनन वोहरा, अनुज रावत, रियान पराग, डेव्हिड मिलर, राहुल तेवातिया, महिपाल लोमरोर, श्रेयस गोपाल, मायंक मार्कंडे, ऍन्डय़्रू टाय, जयदेव उनादकट, कार्तिक त्यागी, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, मुस्तफिजूर रहमान, चेतन साकारिया, केसी करिअप्पा, लियाम लिव्हिंगस्टोन, कुलदीप यादव, आकाश सिंग.
पंजाब किंग्स ः केएल राहुल (कर्णधार व यष्टीरक्षक), मयांक अगरवाल, ख्रिस गेल, मनदीप सिंग, प्रबसिमरन सिंग, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), सर्फराज खान, दीपक हुडा, मुरुगन अश्विन, रवी बिश्नोई, हरप्रीत ब्रार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, इशान पोरेल, दर्शन नळकांडे, ख्रिस जॉर्डन, डेव्हिड मलान, झाय रिचर्डसन, शाहरुख खान, रिले मेरेडिथ, मोईसेस हेन्रिक्यूज, जलज सक्सेना, उत्कर्ष सिंग, फॅबियन ऍलन, सौरभ कुमार.
सामन्याची वेळ ः सायं. 7.30 पासून.
राजस्थान कोणते 4 विदेशी खेळाडू खेळवणार?
शिल्पा शेट्टीच्या राजस्थान रॉयल्स संघात जोस बटलर, बेन स्टोक्स, डेव्हिड मिलर, ऍन्ड्रय़्रू टाय, ख्रिस मॉरिस, मुस्तफिजूर रहमान, लियाम लिव्हिंगस्टोन असे 7 विदेशी खेळाडू असून यापैकी कोणत्या 4 विदेशी खेळाडूंना ते स्थान देणार, हे निवडीतून स्पष्ट होईल. या स्पर्धेतील सर्व प्रँचायझींना प्रत्येक सामन्यात कमाल 4 विदेशी खेळाडू निवडण्याची मुभा आहे.
राहुल, मयांक, मलानबाबत पंजाब महत्त्वाकांक्षी
केएल राहुलच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्स संघात केएल राहुल, मयांक अगरवाल, ख्रिस गेल यांच्यासारखे अव्वल फलंदाज आहेत आणि इंग्लिशमन डेव्हिड मलानमुळे त्यांची फलंदाजी आणखी भक्कम होते. मागील हंगामात केएल राहुलने 670 तर मयांकने 424 धावांची आतषबाजी केली.
तामिळनाडूचा हार्ड हिटिंग फलंदाज एम. शाहरुख खान पदार्पणाच्या प्रतीक्षेत आहे तर विंडीजचा निकोलस देखील या संघात उपलब्ध आहे. त्यामुळे, पंजाबने या हंगामात जोरदार कामगिरी केली तर त्यात आश्चर्याचे कारण असणार नाही. मागील हंगामात राखीव खेळाडूंतच अधिक बसावे लागलेल्या ख्रिस गेलला या सामन्यात लवकर सूर सापडणे पंजाबसाठी विशेष महत्त्वाचे असणार आहे.