प्रतिनिधी / कोल्हापूर
प्रॅक्टीस फुटबॉल क्लब (अ) संघाने बालगोपाल तालीम मंडळवर 3-1 गोलने तर उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम संघाने खंडोबा तालीम मंडळ (ब) संघावर 1-0 गोलने मात केली. दोन्ही विजयी संघांनी आप-आपल्या गुणखात्यात आणखी तीन गुणांची भर टाकली.
छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या केएसए वरिष्ठ गट (ए डिव्हीजन) लीग फुटबॉल स्पर्धेत पाचव्याफेरीतील दुपारी 4 वाजता प्रॅक्टीस (अ) विरुध्द बालगोपाल यांच्यात झाला. बालगोपालच्या अभिनव साळोखे, वैभव राऊत, ऋतुराज पाटील, राहित कुरणे, सुरज जाधव, मनिष मलिक यांनी आक्रमक चढाईचे धोरण अवलंबत प्रॅक्टीसची बचावफळी भेदण्यात यश मिळविले. मिळालेल्या संधीचा फायदा उठवत अवघ्या 6 व्या मिनिटाला ऋतुराज पाटीलने मैदानी गोल करून संघाला 1-0 गोलची आघाडी मिळवून दिली. ही गोल आघाडी कमी करण्यासाठी प्रॅक्टीसच्या आघाडीफळीतील ओंकार मोरे, कैलास पाटील, इम्यान्यूअल, आकाश माळी राहूल पाटील, सागर चिले यांनी वेगवान खेळ करत बालगोपालवर प्रतिहल्ला चढविला. सामन्याच्या 34 व्या मिनिटाला आकाश माळीच्या पासवर इम्यान्यूअलने मैदानी गोल करून संघाला पूर्वार्धात 1-1 गोलची बरोबरी मिळवून दिली.
उत्तरार्धात प्रॅक्टीसकडून सागर चिले, कैलास पाटील तर बालगोपालकडून वैभव राऊत, रोहित कुरणे, सुरज जाधव यांनी गोल करण्याची सोपी संधी दवडली. सामन्याच्या 47 व्या मिनिटाला सागर चिलेच्या पासवर कैलास पाटीलने मैदानी गोल करून प्रॅक्टीसला 2-1 गोलची आघाडी मिळवून दिली. तर अतिरिक्त वेळेत बालगोपालच्या बचावफळीतील खेळाडू रोहित कुरणेने प्रॅक्टीसच्या रोहित भोसलेस धोकादायकरित्या अडविल्याने प्रॅक्टीसला पेनल्टी किक बहाल करण्यात आली. या संधीचा फायदा उठवत इमॅन्यूअलने पेनल्टीवर गोल करून संघाला 3-1 गोलची निर्णायक विजयाची आघाडी मिळवून दिली. सामना प्रॅक्टीसने 3-1 गोलने जिंकला.
तत्पूर्वी, दुपारी 2 वाजता झालेल्या सामन्यात उत्तरेश्वरने खंडोबा (ब) वर 1-0 गोलने मात केली. उत्तरेश्वरकडून श्लोक साठम, लखन मुळीक, संदेश शिंदे, ओंकार खोपकर तर खंडोबाकडून अक्षय बोडके, ओंकार चौगुले, प्रथमेश पाटील, सुर्यप्रकाश सासणे, मंदार पाठक यांनी चांगला खेळ केला. पूर्वार्धात सामन्याच्या 34 व्या मिनिटाला उत्तरेश्वरच्या संदेश शिंदेने मैदानी गोल करून संघाला 1 गोलची आघाडी मिळवून दिली. ही गोल आघाडी कमी करण्यात खंडोबा संघ अपयशी ठरल्याने सामना उत्तरेश्वने 1-0 गोलने जिंकला.
आजचे सामने –
दुपारी 2 वा. – संध्यामठ विरुध्द बीजीएम.
दुपारी 4 वा. – दिलबहार (अ) विरुध्द संयुक्त जुना बुधवार.