वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना महामारी संकटामुळे जागतिक क्रीडाक्षेत्र संपूर्णपणे ठप्प झाले आहे. विविध क्रीडा प्रकारातील क्रीडास्पर्धा लांबणीवर किंवा स्थगित करण्यात आल्या आहेत. मात्र काही युरोपियन देशामध्ये फुटबॉल पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. आणखी काही दिवस शौकिनांना क्रीडाक्षेत्राचा आनंद प्रत्यक्षात उपभोगता येणार नाही. त्यामुळे प्रेक्षकविना क्रीडाक्षेत्र आकर्षक योजना तयार करण्याचा प्रयत्न चालू असल्याचे केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजीजु यांनी सांगितले.
नजिकच्या भविष्यकाळामध्ये बंदीस्त स्टेडियममध्ये प्रेक्षकविना क्रीडा सामने खेळविण्याची शक्यता रिजीजु यांनी वर्तविली आहे. कोव्हिड-19 महामारीमुळे 2020 चा क्रीडा हंगाम पूर्णपणे ठप्प झाला आहे. या संकटामुळे टोकियो ऑलिंपिक स्पर्धा एक वर्षांसाठी लांबणीवर टाकण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला. कोणत्याही क्रीडा प्रकारातील सामने स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या उपस्थितीत भरविण्यास क्रीडामंत्र्यालयाने बंदी घातली असून यामध्ये क्रिकेट सामन्यांचा समावेश आहे. यापुढे क्रीडा क्षेत्रात पूर्वीइतकी आकर्षकता राहील याची खात्री देता येत नाही. त्यामुळे क्रीडाक्षेत्र प्रेक्षकविना कसे अधिक आकर्षक होईल याची योजना तयार करण्याचा प्रयत्न चालू असल्याचे केंद्रीय क्रीडामंत्र्यांनी सांगितले. कोरोना महामारीमुळे देशातील अनेक स्पर्धा रद्द केल्या असून प्रामुख्याने आयपीएल स्पर्धा बेमुदत कालावधीसाठी लांबणीवर टाकल्याने शासनाला फार मोठय़ा आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. देशातील विविध क्रीडाप्रकारातील सराव शिबिरे सप्टेंबरनंतरच सुरू होतील. दरम्यान कोरोना परिस्थितीचा अंदाज घेवूनच क्रीडाक्षेत्राला पुन्हा गती दिली जाईल, असेही रिजिजु यांनी सांगितले.