बॉलिवूड प्रोडय़ूसर एकता कपूरने ऑगस्टच्या प्रारंभी स्वतःचा आगामी चित्रपट ‘प्रेडी’ची घोषणा केली होती. या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत आहे. तर आता यातील नायिकेच्या भूमिकेत अलाया फर्निचरवाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. करण जौहरच्या अनेक चित्रपटांमधून वगळण्यात आल्यावर कार्तिकला एकता कपूरची साथ लाभली होती.
यासंबंधीची माहिती स्वतः अलायाने स्वतःच्या सोशल मीडिया अकौंटवरून दिली आहे. तिने चित्रपटाच्या क्लॅपबोर्डासह एक छायाचित्र इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. या क्लॅपबोर्डावर 21 ऑगस्टची तारीख आणि टेक नंबर 1 असे नमूद आहे. ‘प्रेडीसाठी रेडी, उत्तम टीमसोबत चित्रपटात काम करण्यासाठी आनंदी आहे’ असे तिने म्हटले आहे.
चालू महिन्याच्या प्रारंभी कलाकारांनी मुंबईत चित्रपटाच्या शूटिंगला प्रारंभ केला आहे. प्रेडी एक रोमांटिक थ्रिलर असून यात कार्तिक मुख्य भूमिका साकारत आहे. शशांक घोष या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. पूजा बेदीची मुलगी आणि कबीर बेदी यांची नात असलेल्या अलायाने 2020 मध्ये प्रदर्शित ‘जवानी जानेमन’ चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.