आत्महत्येपूर्वीची चित्रफित : अहमदाबादच्या महिलेची साबरमतीमध्ये उडी
वृत्तसंस्था / अहमदाबाद
गुजरातच्या अहमदाबाद शहरात एका विवाहित महिलेच्या आत्महत्येचे प्रकरण समोर आले आहे. आत्महत्येपूर्वी महिलेने भावुक चित्रफित तयार करून स्वतःच्या कुटुंबीयांना संदेश दिला आहे. ‘हे प्रेम नदी, मला तुझ्यात सामावून घे अशी प्रार्थना करते’ असे म्हणत महिलेने पुलावरून साबरमती नदीत उडी घेतली आहे. चित्रफित मिळताच कुटुंबाने पोलिसांना कळविले आहे. त्यानंतर अग्निशमन दल आणि बचावपथकाने नदीतून आयशाचा मृतदेह बाहेर काढला आहे.
‘माझे नाव आयशा आरिफ खान आणि आत्महत्या मी माझ्या मर्जीने करत आहे. याकरता कुणाचाच दबाव नाही, देवाने दिलेले जीवन इतकेच होते आणि मला एवढे जीवन अत्यंत समाधानाचे मिळाले आणि बाबा कधीपर्यंत लढत राहणार, खटला मागे घ्या’ असे आयशाने चित्रफितीत म्हटले आहे.
संघर्ष हा माझा स्वभावच नाही, आरिफवर प्रेम करत असल्याने त्याला त्रास कसा होऊ देऊ? जर त्याला मुक्तता हवी असल्यास ती त्याला मिळावी. माझे जीवन तर इथपर्यंतच आहे. माझ्याकडून कुठली चूक झाली असे देवाला विचारणार आहे? आईवडिल, मित्र सगळेच अत्यंत चांगले मिळाले. पण कुठे ना कुठे माझ्यातच उणीव राहिली. पुन्हा माणसांचा चेहरा दाखवू नकोस इतकीच देवाकडे प्रार्थना करत असल्याचे आयशाने चित्रफितीत म्हटले आहे.
वाऱयाप्रमाणे वाहू इच्छिते
प्रेम करायचे असले तर दोन्ही बाजूने करा, एकतर्फी प्रेमात काहीच साध्य होत नाही. प्रेम तर विवाहानंतरही अपूर्ण राहते. हे प्रेमळ नदी मला तुझ्यात सामावून घे आणि माझ्यामागे काहीही घडो, पण अधिक वादंग होऊ देऊ नका अशी प्रार्थना करते. मी वाऱयाप्रमाणे असून केवळ वाहू इच्छिते. कुणासाठीच थांबू नका, ज्या प्रश्नांची उत्तरे हवी होती ती मिळाल्याने आनंदी आहे. प्रार्थनांमध्ये मला आठवा, स्वर्ग मिळेल की नाही माहित नाही, असे आयशा म्हणत असल्याचे चित्रफितीत दिसून येते.
2018 मध्ये विवाह
अहमदाबाद येथील रहिवासी आणि व्यवसायाने टेलर असलेल्या आयेशाचे वडिल लियाकन यांनी मुलीचा विवाह 2018 मध्ये जालौर (राजस्थान)चा रहिवासी आरिफ खानशी झाल्याचे सांगितले. विवाहानंतर तिचा हुंडय़ासाठी छळ करण्यात येत होता. आरिफने हुंडय़ाची मागणी करत आयशाला माहेरी सोडले होते.
मरायचे असेल तर मर दीड लाख रुपये दिल्यावर आरिफच्या कुटुंबाची हाव अधिकच वाढली. काही महिन्यांनी आरिफने पुन्हा आयशाला अहमदाबाद येथे सोडले. आरिफ फोनवर देखील तिच्याशी बोलत नव्हता. काही दिवसांपूर्वी आयशाने संतापाच्या भरात आत्महत्या करणार असल्याचे सांगितले असता आरिफने मरायचे असेल तर मर असे सुनावले होते. तेव्हापासूनच आयशा दुखावली होती असे लियाकल अली यांचे म्हणणे आहे.