म्हादई, मोले बचावचे निवेदन देण्यास गेले होते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी : मुख्यमंत्र्यांच्या अटींमुळे केली निदर्शने
प्रतिनिधी / पणजी
‘म्हादई वाचवा, मोले वाचवा’ अशी मागणी करत प्रोग्रेसिव्ह फ्रंट ऑफ गोवाच्या नेतृत्वाखाली काल बुधवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना भेटण्यास त्यांच्या आल्तीनो येथील निवासस्थानी गेलेल्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्याने वातावरण तंग झाले. रात्री उशिरा त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.
गोव्याची जीवनदायीनी असलेल्या म्हादई नदीचे पाणी कर्नाटकाने वळविले असल्याचे सिद्ध झालेले असतानाही गोवा सरकार काहीच करत नाही, दुसऱया बाजूने मोले येथे वनसंपत्तीचा संहार करून वेगवेगळे प्रकल्प आणण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या सर्वांचा विविध स्तरांवर विरोध आणि निषेध होत असतानासुद्धा सरकारला काहीच पडलेले नाही, त्यासंबंधी जाब विचारण्यासाठी सदर कार्यकर्ते बुधवारी आल्तीनो येथे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आले होते. आमदार आलेक्स लॉरेन्स हे त्यांचे नेतृत्व करत होते. परंतु मुख्यमंत्र्यांनी त्यांना भेट नाकारली.
मुख्यमंत्र्यांनी भेटण्यास केवळ चौघांनाच दिली अनुमती
जेमतेम 20 कार्यकर्ते होते, परंतु त्यांना रोखण्यासाठी 100 च्या आसपास पोलिसांची फौज बोलावण्यात आली होती. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. प्रथम आमदार लॉरेन्स यांनी त्यांच्यावतीने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सर्व माहिती दिली. त्यांनी नंतर बाहेर येऊन केवळ चौघांनाच मुख्यमंत्र्यांनी भेटण्यासाठी बोलावले असल्याचा संदेश दिला. त्यानुसार चौघे जाण्यास तयारही झाले.
मुख्यमंत्र्यांच्या अटीमुळे कार्यकर्त्यांनी केला निषेध
चौघेजण तयार झाल्यानंतर, त्यातील निवडक कार्यकर्त्यांशीच मुख्यमंत्री बोलतील असा संदेश आतून आला. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेवर सदर कार्यकर्त्यांनी आश्चर्य व्यक्त करत आत जाण्यास नकार दर्शविला व जोरदार घोषणाबाजी करत बंगल्यासमोरील रस्त्यावरच त्यांनी ठाण मांडले.
कार्यकर्त्यांना उचलून नेले पोलिसस्थानकावर
’भिवपाची गरज ना’ असे सदैव म्हणणारे मुख्यमंत्री केवळ दहा जणांच्या शिष्टमंडळास एवढे का घाबरतात? आणि त्यांच्यासाठी शेकडो पोलीस का आणतात? अशी टीका करत सर्वांनी त्यांची खिल्ली उडविली. तसेच आता मुख्यमंत्र्यांनी स्वतःच भेटण्यासाठी यावे, अशी मागणी केली. त्यानंतर काही वेळाने पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेत बसमध्ये कोंबून पोलीस स्थानकावर नेले.
सतरा जणांना अटक व जामिनावर सुटका
पोलिसांनी बसमधून नेण्यात आलेल्या प्रोग्रेसिव्ह पंट ऑफ गोवाच्या कार्यकर्त्यांना 151 कलमाखाली अटक करण्यात आली. महेश म्हांब्रे, हृदयनाथ शिरोडकर, प्रजल साखरदांडे, सिसिल रॉड्रिगीश, झिना परेरा, यांच्यासह 17 कार्यकर्त्यांचा त्यात समावेश होता. रात्री उशिरा त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.