पहिल्या दिवशी तीन लढती, यू मुम्बा-बेंगळूर बुल्स यांच्यात पहिली लढत
वृत्तसंस्था/ बेंगळूर
प्रो कबड्डी लीगच्या (पीकेएल) आठव्या मोसमाला बुधवारपासून येथे सुरुवात होत असून सहभागी सर्व 12 संघ येथे दाखल झाले आहेत. कोरोनाच्या कारणास्तव ही या स्पर्धा यावेळी एकाच ठिकाणी खेळविली जाणार आहे. या स्पर्धेतील सामन्यांसाठी प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नसून बायोबबलमध्येच ही स्पर्धा खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आठव्या मोसमाची पहिली लढत माजी विजेते यू मुम्बा व बेंगळूर बुल्स यांच्यात होणार आहे. त्यानंतर तेलुगू टायटन्स व तामिळ थलैवाज ही तामिळ डर्बी लढत होईल या मोसमातील पहिल्या चार दिवसांत तीन-तीन सामने होणार असून त्यानंतरच्या प्रत्येक शनिवारी तीन सामने खेळविले जाणार आहेत. पहिल्या दिवशी विद्यमान विजेता बंगाल वॉरियर्स व यूपी योद्धा यांच्यात तिसरा सामना होणार आहे.
मागील मोसमात सर्वाधिक गुण नोंदवणारा पवन कुमार शेरावत याच्यावर मुंबईविरुद्धच्या लढतीत बेंगळूर बुल्सची मुख्य भिस्त असेल. चढाईत अनेक गुण मिळविण्याचे त्याचे कौशल्य यावरच सर्वांचे लक्ष असणार आहे. यू मुम्बाचा संघ तुलनेने अननुभवी असून शेरावतविरुद्ध ते कसा बचाव करतात हे पहावे लागेल. मागील मोसमात दबंग दिल्लीकडून खेळलेल्या अनुभवी चंद्रन रणजितलाही बेंगळूरने आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे. यू मुम्बाच्या आशा फाझल अत्राचलीच्या बचावाच्या क्षमतेवर अवलंबून असतील. अनुभवी बेंगळूर बुल्सच्या अमित शेरॉन, सौरभ नंदल व महेंद्र सिंग यांच्या भक्कम बचावाविरुद्ध मुम्बाचे युवा रेडर्स अभिषेक व अजित आपली कामगिरी सुधारण्यावर भर देतील.
दुसऱया सामन्यात तेलुगू टायटन्सची मुख्य भिस्त सिद्धार्थ देसाई व रोहित कुमार या अनुभवी रेडर्सवर असेल. मात्र थलैवाजचा ब्लॉक मास्टर म्हणून ओळखल्या जाणाऱया सुरजीतसमोर त्यांची मोठी कसोटी लागेल. सुरजीतने पीकेएलच्या इतिहासात सर्वाधिक 116 यशस्वी ब्लॉक्स नोंदवले आहेत. मनजीत व अतुल एम. हे थलैवाजचे युवा रेडर्स असून अनुभवी प्रपंजनची त्यांना साथ असेल.
दरम्यान, विद्यमान विजेते बंगाल वॉरियर्सची सलामीची लढत यूपी योद्धाशी होणार आहे. पाचव्या मोसमापासून पीकेएलमध्ये सामील झालेल्या यूपी योद्धाने आजपर्यंत प्रत्येकी वेळी प्लेऑफ फेरी गाठलेली आहे. त्यांनी सर्वाधिक मागणी असलेला रेडर परदीप नरवालला लिलावातून आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे. त्याला सुरेंद्र गिलची साथ मिळेल. बंगाल वॉरियर्सच्या बचावाची या लढतीत कसोटी लागणार असून यासाठी त्यांना करो या मरो स्थितीत असताना उत्तम प्रदर्शन करणाऱया श्रीकांत जाधववर अवलंबून रहावे लागेल. बचावाच्या बाबतीत बंगाल वॉरियर्सला मोहम्मद ईस्माईल नबिबक्ष व अबोझर मोहाजिर मिघानी या इराणी जोडीवर अवलंबून रहावे लागेल.
आजचे सामने
1) यू मुम्बा वि. बेंगळूर बुल्स
वेळ ः रात्री 7.30 वा.
2) तेलुगू टायटन्स वि. तामिळ थलैवाज
वेळ ः रात्री 8.30 वा.
3) यूपी योद्धा वि. बंगाल वॉरियर्स
वेळ ः रात्री 9.30 वाजता.
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्स नेटवर्क.