वृत्तसंस्था/ बेंगळूर
प्रो कबड्डी लीगचे आयोजक मशाल स्पोर्ट्स यांनी लीगच्या शेवटच्या प्लेऑफ टप्प्याचे व अंतिम सामन्याचे वेळापत्रक बुधवारी जाहीर केले. त्यांनी आजवरच्या सर्व सामन्यांचे यशस्वीरीत्या आयोजन करीत शंभरहून अधिक सामने पूर्ण केले असून पीकेएल 8 पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इनडोअरमध्ये तसेच खेळाडूंचा स्पर्श होणाऱया लीगचे देशात पहिल्यांदाच यशस्वी आयोजन झाले आहे.
यावेळची स्पर्धा अतिशय चुरशीची झाली असून अनेक संघांत प्लेऑफ गाठण्यासाठी चुरस लागली आहे. लीगच्या शेवटच्या साखळी सामन्यापर्यंत ही चुरस पहावयास मिळणार आहे. त्यानंतर अव्वल सहा संघांत पीकेएल ट्रॉफीसाठी संघर्ष होणार आहे. प्लेऑफचे सामने 21 ते 23 फेब्रुवारी या कालावधीत होतील तर अंतिम सामना 25 फेब्रुवारी रोजी होणार आहे. यावर्षी ही स्पर्धा एकाच ठिकाणी प्रेक्षकांविना खेळविण्याचा प्रयोग करण्यात आला आणि तो प्रचंड यशस्वीही ठरला. स्पर्धेचा दर्जाही सुधारल्याचे त्यात दिसून आले असून चाहत्यांकडूनही त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.