पाटणा पायरेट्स-यूपी योद्धा व बेंगळूर बुल्स-दबंग दिल्ली आमनेसामने
बेंगळूर / वृत्तसंस्था
प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज (बुधवार दि. 23) लीग टॉपर्स पाटणा पायरेट्सविरुद्ध यूपी योद्धा तर दबंग दिल्लीविरुद्ध बेंगळूर बुल्स यांच्यात निर्णायक उपांत्य सामने रंगणार आहेत. या हंगामातील साखळी फेरीत पाटणाने बचावातील लक्षवेधी कामगिरीच्या बळावर उत्तम वर्चस्व गाजवले. मात्र, आता उपांत्य लढतीत त्यांच्यासमोर प्रदीप नरवालसारखा आपलाच माजी संघसहकारी खेळाडू विरोधात उभा ठाकलेला असेल. प्रदीपने यापूर्वी पाटणा संघाला तीनवेळा जेतेपद मिळवून दिले आहे.
प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या सातव्या हंगामातील उपजेता दिल्लीचा संघ सलग दुसऱयांदा अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी महत्त्वाकांक्षी आहे. मात्र, यासाठी त्यांना बेंगळूर बुल्सचे तगडे आव्हान भेदावे लागेल. बेंगळूर बुल्सचा संघ अलीकडील काही लढतीत आपण फक्त पवन सेहरावतवर अवलंबून नाही, असे प्रत्यक्षात सिद्ध करण्यात बऱयापैकी यशस्वी ठरला आहे. सेकंडरी रायडर्स भरत व चंद्रन रणजीत यांना यात उत्तम फॉर्म गवसला आहे.
पहिल्या उपांत्य लढतीत रेकॉर्ड ब्रेकर प्रदीप नरवालवर मुख्य लक्ष केंद्रित असेल. अलीकडील काही सामन्यात हा स्टार रायडर उत्तम फॉर्ममध्ये दिसून आला असून पाटणाविरुद्ध तो मेजर ट्रम्प कार्ड ठरेल, असा होरा आहे. पाटणा संघाला गुणतालिकेत अव्वलस्थान संपादन केल्यानंतर उपांत्य फेरीत थेट स्थान लाभले. इराणच्या मोहम्मदरेझाच्या भरभक्कम बचावामुळे हा संघ सर्वाधिक धोकादायक ठरत आला आहे.
पाटणाचा संघ प्रदीपचे रेड कसे हाताळणार, यावर या लढतीची बरीच समीकरणे अवलंबून असणार आहेत. डावखुरा प्रदीप हा मोहम्मदरेझाला थेट आमनेसामने भिडेल, असे चित्र नाही. मात्र, नीरज कुमार व सजिन सी. यांचा खेळ यावेळी विशेष महत्त्वाचा ठरु शकतो. यापूर्वी पुणे संघाला प्रदीपच्या 5 गुणांच्या सुपररेडमुळेच पराभवाच्या रुपाने मोठी किंमत मोजावी लागली होती. योद्धासाठी सुरेंदर गिल हा दुसरा महत्त्वाचा खेळाडू असेल. सुमित व नितेश कुमार यांचे कॉम्बिनेशन देखील महत्त्वाचे असणार आहे.
पाटणा संघाचे आक्रमण कसे बहरत जाईल, यावरही बरीच समीकरणे अवलंबून असतील. सचिनचा फॉर्म त्यांच्यासाठी विशेष महत्त्वाचा असणार आहे. प्रशिक्षक राम मेहर सिंग हे मात्र लक्षवेधी गूमन सिंगऐवजी अनुभवी मोनू गोयतला पसंती देऊ शकतील, असा होरा आहे. लीगमध्ये दोन्ही संघ दोनवेळा आमनेसामने भिडले, त्यावेळी त्यांनी प्रत्येकी एकदा विजय मिळवला आहे.
दिल्ली-बेंगळूरमध्येही रस्सीखेच अपेक्षित
दिल्ली व बेंगळूर यांच्यातील दुसरी उपांत्य लढत ही केवळ नवीन कुमार व पवन सेहरावत या दोन्ही सर्वोत्तम रायडर्समधील लढत अजिबात नसेल. नवीनच्या गैरहजेरीत दिल्लीच्या मनजीत चिल्लर, संदीप नरवालसारख्या खेळाडूंनी दमदार प्रदर्शन साकारले आहे. याचप्रमाणे बेंगळूरचा संघ भक्कम बचाव व सेकंडरी रायडर्सच्या दमदार खेळामुळे प्रभावी ठरत आला आहे. नवीनची तंदुरुस्ती महत्त्वाची असेल. मात्र, लीगमध्ये दुसरे स्थान संपादन केल्यानंतर उपांत्य फेरीसाठी थेट प्रवेश मिळवणाऱया दिल्लीला अधिक विश्रांती लाभली आहे. चंद्रन रणजीत व विजय यांच्यासारखे दमदार रायडर आणि पवन सेहरावतसारखा हाय फ्लायर हे बेंगळूरचे बलस्थान असेल. सौरभ नंदल व अमन हे कॉर्नर सम्राट संघाला आणखी मजबुती देणारे असतील. यामुळे कव्हर डिफेंडर महेंदरला देखील खेळात मोकळीक लाभत आली आहे. अनुभव हा दबंगचा सर्वात मजबूत दुवा मानला जातो. मनजीत चिल्लर, जोगिंदर नरवाल, संदीप नरवाल लक्षवेधी खेळाडू ठरत आले असून त्यांनी अनेकदा फायनल्समध्ये सहभाग दर्शवला आहे. साहजिकच, दडपण कसे हाताळायचे, याचा त्यांना उत्तम अनुभव आहे. विजयच्या रुपाने लक्षवेधी अष्टपैलू व नवीनच्या रुपाने उत्तम बॅकअप त्यांच्याकडे उपलब्ध आहे. दोन्ही संघ लीगमध्ये आमनेसामने भिडले, त्यावेळी बुल्सने एक विजय संपादन केला तर दुसरा सामना टाय राहिला होता.