वृत्तसंस्था/ बेंगळूर
आठव्या प्रो. कबड्डी लीग हंगामातील शुक्रवारी येथे झालेल्या 80 व्या सामन्यात पाटणा पायरेट्सने तमिळ थलैवाजचा 52-24 अशा 28 गुणांच्या फरकाने पराभव केला. या विजयामुळे पाटणा संघाने प्ले ऑफ गटातील प्रवेशांच्या शर्यतीमध्ये आपली बाजू अधिक मजबूत केली आहे.
पाटणा पायरेट्स संघाच्या बचावफळीतील मोहम्मदरेझा सेदलोरीने 6 टॅकल गुण तसेच नीरजकुमारने 6 टॅकल गुण व सुनीलने 5 टॅकल गुण नोंदविले. या स्पर्धेच्या इतिहासात पाटणा पायरेट्सची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.
सामन्यातील 13 व्या मिनिटाला पाटणा पायरेट्सने पहिल्यांदा तमिळ थलैवाजचे सर्व गडी बाद केले. मध्यंतरापर्यंत पाटणा संघाने थलैवाजवर 21-12 अशी आघाडी मिळविली होती. मध्यंतरानंतर चौथ्या मिनिटाला पाटणा संघाने दुसऱयांदा थलैवाजवर पुन्हा ऑल आऊटची नामुष्की आणली. सामना संपण्यास 8 मिनिटे बाकी असताना पुन्हा ते याच स्तरावर आले.
या कामगिरीमुळे पाटणा संघाने शेवटच्या पाच मिनिटाच्या कालावधीत 24 गुणांची आघाडी मिळविली. सामन्यातील शेवटच्या मिनिटाला नीरजकुमार आणि सुनील यांच्या शानदार कामगिरीमुळे पाटणा संघाने हा सामना 28 गुणांच्या फरकाने जिंकत स्पर्धेच्या गुणतक्त्यात दुसऱया स्थानावर झेप घेतली आहे.