क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव
गोवा फुटबॉल संघटनेने आयोजित केलेल्या गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत अव्वल स्थानी असलेल्या साळगावकर फुटबॉल क्लबला पहिला धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. काल जीएफएच्या धुळेर मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात साळगावकरला पणजी फुटबॉलर्सने एकमेव गोलने पराभूत केले आणि तीन गुणांची कमाई केली.
जॉयसन गावकरने सामन्याच्या 81व्या मिनिटाला केलेला गोल निर्णायक ठरला. आठ सामन्यांनंतर प्रथमच साळगावकर एफसीला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात साळगावकरने पॅरी परेरा आणि आंतूश मॉनिज तर पणजी फुटबॉलर्स संघाने वाल्मिकी मिरांडा आणि लिस्टन कार्दोज यांना संधी दिली.
धुळेरवरील कालचा हा सामना चांगलाच रंगला. दोन्ही संघांनी आक्रमक आणि प्रोफेशनल खेळाचे दर्शन घडविले. आरंभालाच साळगावकरच्या प्रथमेश सातार्डेकरने पणजी फुटबॉलर्सच्या कृष्णा गावसला पाडल्याबद्दल पेनल्टीची मागणी केली होती, मात्र रेफ्री प्रसाद सुर्लकरने ती फेटाळून लावताना पणजी फुटबॉलर्सला फ्रिकीक बहाल केली. त्यानंतर साळगावकरच्या आंतूश मॉनिजने हाणलेला फटका पणजी फुटबॉलर्सचा गोलरक्षक प्रॅस्टन रेगोने उत्कृष्टपणे अडविला.
त्यानंतर पणजी फुटबॉलर्सच्या कृष्णा गावसच्या पासवर लॉईड कार्दोजचा गोल करण्याचा यत्न साळगावकरचा गोलरक्षक जेसन डिमेलोच्या सरळ हातात गेला. लगेच साळगावकरच्या फिझर गोम्सीच गोल करण्याची संधी पणजी फुटबॉलर्सच्या गोलरक्षकाने उधळून लावली. जॉयसन गावकरने त्यानंतर साळगावकरच्या दोन बचावपटूंना गुंगारा देत मारलेला फटका साळगावकरच्या गोलपोस्टला लागला व गोलरक्षकाला लागून कॉर्नरसाठी बाहेर गेला. सामन्याच्या 81व्या मिनिटाला सिरील डायसने दिलेल्या पासवर जॉयसन गावकरने यावेळी चुक न करता चेंडूला गोलमध्ये मारले आणि विजयी गोलाची नोंद केली.