क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
गोवा फुटबॉल संघटनेने आयोजित केलेल्या गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेतील लढतात सेसा फुटबॉल अकादमीने यूथ क्लब मानोरा संघाला 5-3 गोलांनी पराभूत केले. जीएफएच्या धुळेर मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात मध्यंतराला सेसा फुटबॉल अकादमीचा संघ पाच गोलानी आघाडीवर होता. यूथ क्लब मानोराने आपले सर्व तीन गोल दुसऱया सत्रात केले.
सामन्याच्या दहाव्याच मिनिटाला अमन राजभारच्या पासवर ओंकारने गोल करून संघाला आघाडवर नेले. लगेच 22व्या मिनिटाला रिजबॉनने विष्णू गोसावीच्या पासवर सेसा फुटबॉल अकादमीच्या दुसऱया गोलची नोंद केली. सेसाचा आक्रमक खेळ त्यानंतरही चालूच राहिला. त्यानंतर विष्णू गोसावीच्या पासवर मायरॉन परेराने प्रतिस्पर्धी संघाचा गोलरक्षक ऍनिस्टनला भेदले आणि सेसाचा तिसरा गोल नोंदविला. 36व्या मिनिटाला अमन राजभारने सेसाचा चौथा तर मध्यंतरापूर्वी यूथ क्लब मानोराचा गोलरक्षक ब्रॅडमनच्या चुकीचा फायदा घेत रिजबॉनने पाचवा गोल नोंदविला. दुसऱया सत्रात यूथ ऑफ मानोरा संघाने सुधारीत खेळ केला आणि सेसा फुटबॉल अकादमीवर तीन गोल केले. प्रथम 50व्या मिनिटाला रजिंदरने गोल केला. त्यानंतर इल्डॉन कुलासो आणि जॉयविन कार्नेरोने मानोराचे गोल केले. या विजयाने सेसा फुटबॉल अकादमीला 3 गुण प्राप्त झाले. आज सोमवारी या स्पर्धेत कुडचडेच्या गार्डीयन एँजल स्पोर्ट्स क्लब आणि कळंगूट असोसिएशन संघात सामना होईल.