मडगाव : गोवा फुटबॉल संघटनेने आयोजित गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत स्पोर्टिंग क्लुब दी गोवाने विजयाची नोंद केली. काल जीएफएच्या धुळेर मैदानावर स्पोर्टिंग क्लुब दी गोवाने वास्को स्पोर्ट्स क्लबचा एकमेव गोलने पराभव केला.
कालच्या सामन्यात वास्को क्लबने चर्चिल ब्रदर्सविरूद्धच्या सामन्यात विजय मिळविलेला संघ कायम ठेवला. पहिल्या सत्रात दोन्ही संघांचा खेळ जास्त वेळ मध्यभागीच होताना दिसला. वास्कोला पहिल्या सत्रात गोल करण्याची नामी संधी होती. यावेळी डॅनील रिबेलोने घेतलेल्या कॉर्नरवर सॅन्वील डिकॉस्ताचा गोलमध्ये जाणारा हेडर किंचित हुकला. स्पोर्टिंग क्लुबच्या विजयी गोलाची नोंद 45व्या मिनिटाला दत्ताराज गावकरने केली. गिरीश नाईकने दिलेल्या पासवर दत्ताराज गावकरने वास्को क्लबचा गोलरक्षक संजू थापाला चकविले व गोल नोंदविला. या विजयाने स्पोर्टिंग क्लुब दी गोवाला तीन गुण प्राप्त झाले. हा त्यांचा स्पर्धेतील पहिला विजय ठरला.