मडगाव : थरारक सामन्यात वेळसाव स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लबचा 3-2 गोलांनी पराभव करून वास्को स्पोर्ट्स क्लबने गोवा फुटबॉल संघटनेने आयोजित केलेल्या गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत विजय साकारला.
काल हा सामना जीएफएच्या धुळेर मैदानावर खेळविण्यात आला. वास्को क्लबसाठी डॅस्मोन गामा, डॅनील रिबेलो व अनिल गावकरने तर वेळसाव क्लबसाठी रॉनील आझावेदो व ब्रायन मास्कारेन्हस यांनी गोल केले. या विजयाने वास्को क्लबला 3 गुण प्राप्त झाले. वास्को क्लबचा हा पाचव्या सामन्यांतून चौथा विजय आहे. त्यांचे आता 12 गुण झाले असून वेळसावचा पाच सामन्यांतून फक्त एक गुण झाला आहे. सामन्याच्या चौथ्याच मिनिटाला वेळसावच्या रॉनील आझावेदोने गोल नोंदवून आघाडी घेतली. मात्र लगेच डॅनील रिबेलोच्या पासवर डेस्मॉन गामाने वास्कोला बरोबरी गाठून दिली. त्यानंतर डॅनील रिबेलोने गोल करून वास्कोला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. लगेच डॅनीलच्या फ्रिकीवर ताबा मिळवित वास्कोच्या अनिल गावकरने संघाचा तिसरा गोल केला. इंज्युरी वेळेत वेळसावच्या ब्रायन मास्कारेन्हसने इक गोल करून संघाची पिछाडी कमी केली.