वृत्तसंस्था/ लॉसेन
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या 2021 महिला प्रो हॉकी लिगमध्ये यावेळी भारत आणि स्पेनचे संघ बदली संघ म्हणून सहभागी होणार आहेत. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघानी या स्पर्धेतून माघार घेतल्याने त्यांच्या जागी स्पर्धा आयोजकांनी भारत आणि स्पेन यांना या स्पर्धेत खेळण्याची संधी दिली आहे. सदर घोषणा शुक्रवारी आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या प्रवक्त्याने केली.
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या महिलांच्या तिसऱया प्रो लिग हंगामाला 13 ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेत ऑलिम्पिक विश्वविजेता हॉलंड आणि बेल्जियम यांच्यात सलामीची लढत होणार आहे. मात्र चौथ्या प्रो लिग महिलांच्या हॉकी हंगामामध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांचा पुन्हा समावेश राहिल, असे सांगण्यात आले. कोरोना समस्येमुळे आंतरराष्ट्रीय प्रवासावर घातलेल्या निर्बंधामुळे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघाने महिलांच्या प्रो लिग तसेच भारतात होणाऱया आगामी कनिष्ठांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत आणि आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या इनडोअर विश्वचषक हॉकी स्पर्धेतून माघार घेतली आहे. आशिया क्रीडा स्पर्धा 2022 साली होणार आहे. या स्पर्धेसाठी जगातील बलाढय़ हॉकी संघांना चालू वर्षामध्ये सराव म्हणून हॉकी प्रो लिग स्पर्धेत खेळण्याची संधी लाभली आहे. 2022 सालातील आशियाई क्रीडा स्पर्धा ही आगामी ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा म्हणून ओळखली जाईल.