रबिचंद्र सिंग नवा चेहरा, गुर्जंत सिंगचे पुनरागमन,
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मिडफिल्डर रबिचंद्र सिंग मोइरंगथेमला वरिष्ठ स्तरावरील हॉकीत पदार्पण करण्याची संधी मिळाली असून अर्जेन्टिनाविरुद्ध होणाऱया एफआयएच प्रो लीग लढतीसाठी जाहीर करण्यात आलेल्या 22 सदस्यीय संघात त्याची निवड करण्यात आली आहे. याशिवाय दुखापतीनंतर पूर्ण फिट झालेल्या गुर्जंत सिंगनेही या संघात पुनरागमन केले आहे.
जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असणाऱया अर्जेन्टिनाविरुद्ध 19 व 20 मार्च रोजी भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियमवर सामने होतील. एफआयएच ज्युनियर वर्ल्ड कपमध्ये भाग घेतलेल्या भारतीय संघात रबिचंद्र सिंगचा समावेश होता. आगामी लढतीसाठी जाहीर केलेल्या संघात तो एकमेव नवा चेहरा आहे. मुख्य संघात काही बदल करण्यात आले असून गोलरक्षक सुरज करकेराच्या जागी कृष्ण बहादूर पाठकला तर अमित रोहिदास व जुगराज सिंग यांना मनदीप मोर व दिप्सन तिर्की यांच्याऐवजी बॅकलाईनमध्ये स्थान देण्यात आले आहे. मिडफिल्डमध्ये जसकरण सिंग, आकाशदीप सिंग यांच्या जागी सुमित व रबिचंद यांना निवडण्यात आले आहे.
आघाडी फळीत गुर्जंत व दिलप्रीत सिंग यांचे पुनरागमन झालेले दिसेल. मनदीप सिंग, ललित कुमार उपाध्याय, शिलानंद लाक्रा, सुखजीत सिंग, अभिषेक सिंग यांचाही समावेश आहे. मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील या संघात अनुभवी गोलरक्षक पीआर श्रीजेश व उपकर्णधार आणि ड्रगफ्लिकर हरमनप्रीत सिंग यांचाही समावेश आहे. निवड समितीने 10 राखीव खेळाडूंचीही निवड केली आहे.
युवा आणि नवोदित खेळाडूंना या लढतींतून चांगला अनुभव मिळणार असून आशियाई क्रीडा स्पर्धा नजरेसमोर ठेवून या लढतींत आम्ही विविध कॉम्बिनेशन्स आजमावून पाहणार आहोत. रबिचंद्रने आपली क्षमता ज्युनियर वर्ल्डमध्ये दाखवून दिली आहे. प्रतिस्पर्ध्यांच्या बचावफळीवर तो दडपण आणण्यात माहीर असून चेंडूवर त्याचे कमालीचे नियंत्रण दिसून आले आहे. त्याचे हे गुण या लढतीत पाहण्यास आम्ही उत्सुक झालो आहे, असे मत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांनी व्यक्त केले.
भारताने प्रो लीगमध्ये आतापर्यंत सहा सामने खेळले असून 12 गुणांसह ते दुसऱया स्थानावर आहेत. 16 गुण घेत नेदरलँड्सने पहिले स्थान मिळविले आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेचा दोन्ही सामन्यांत विजय मिळविला, फ्रान्सविरुद्ध एक सामना जिंकला व एक गमविला आणि स्पेनविरुद्ध एक जिंकला, एक सामना गमविला.
भारतीय हॉकी संघ ः गोलरक्षक-पीआर श्रीजेश, कृष्ण बहादुर पाठक. बचावफळी-हरमनप्रीत सिंग, जुगराज सिंग, सुरेंदर कुमरा, वरुण कुमार, जर्मनप्रीत सिंग, अमित रोहिदास. मध्यफळाr-मनप्रीत सिंग, विवेक सागर प्रसाद, हार्दिक सिंग, सुमित, निलकांता शर्मा, एम. रबिचंद्र सिंग. आघाडी फळी-गुर्जंत सिंग, मनदीप सिंग, ललित कुमार उपाध्याय, शिलानंद लाक्रा, सुखजीत सिंग, अभिषेक, दिलप्रीत सिंग. राखीव खेळाडू ः सुरज करकेरा, मनदीप मोर, दिप्सन तिर्की, निलम संजीप झेस, संजय, जसकरण सिंग, आकाशदीप सिंग, आशिष कुमार टोपनो, गुरसाहिबजित सिंग, मोहम्मद राहील.