माळरानावर सापडला मृतदेह : धारदार हत्याराने वार : मयताच्या घरापर्यंत श्वानाकडून माग
प्रतिनिधी / देवगड:
देवगड तालुक्मयातील दहिबाव आयतन पन्हाळ येथील माळरानावर मोहन फटू कदम (60, रा. दहिबाव मधलीवाडी) यांचा मृतदेह मंगळवारी सकाळी आढळून आला. ते सोमवारी सकाळी माळरानावर गुरे राखण्यासाठी गेले होते. त्यांच्या शरीरावर धारदार हत्याराने वार करण्यात आले होते. त्यामुळे त्यांची हत्या झाल्याची तक्रार त्यांचा पुतण्या प्रणिकेत प्रभाकर कदम यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली आहे. त्यानुसार देवगड पोलीस स्थानकात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या निर्घृण खुनाने दहिबाव हादरले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहिबाव मधलीवाडी येथील मोहन कदम हे मुलगी माधुरी मोहन कदम, भावजय सुनिता कदम, पुतण्या प्रणिकेत कदम यांच्यासमवेत राहत होते. शेती व्यवसायावर त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. कदम व संजय चंद्रकांत मसुरकर यांची दहिबाव पन्हाळ ‘52 खंड’ याठिकाणी सामाईक जागा आहे. ही जागा जंगलमय असून मोहन कदम हे नेहमी गुरे घेऊन तेथे जात. सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मोहन कदम हे पुतण्या प्रणिकेतसमवेत गुरे घेऊन दहिबाव पन्हाळ याठिकाणी निघाले. मात्र, प्रणिकेत हा अर्ध्यावरून घरी परतला. त्यानंतर मोहन कदम हे गुरे चरण्यासाठी सोडून सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास घरी आले. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोहन कदम हे गुरे आणण्याकरिता छत्री व हातात काठी घेऊन निघून गेले.
गुरे घरी परतली, पण..
सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सोडलेली गुरे घरी परतली. मात्र, मोहन कदम घरी आले नाहीत. त्यामुळे सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास पुतण्या प्रणिकेत हा तेथील राजू चव्हाण याच्यासमवेत मोहन कदम यांचा शोध घेण्यासाठी दहिबाव पन्हाळ याठिकाणी गेला. पण मोहन कदम यांचा शोध न लागल्याने ते घरी परतले. याची माहिती प्रणिकेतने त्यांचे शेजारी प्रकाश कदम यांना दिली. रात्री उशिरापर्यंत मोहन कदम हे घरी न परतल्याने त्यांची वाट पाहून घरातील सर्वजण झोपी गेले.
मोहन यांच्या शोधासाठी ग्रामस्थ एकवटले
मंगळवारी सकाळी उठल्यानंतर प्रणिकेतने आपल्या आईकडे काका मोहन कदम यांची विचारपूस केली. यावेळी त्याच्या आईने मोहन हे घरी आलेच नसल्याचे सांगितले. त्यानंतर प्रणिकेतने त्यांचे शेजारी विकास मसुरकर, संतोष शेटये, रमेश नवलू, अनिल नवलू, उमा घाडी व घाडीवाडीतील ग्रामस्थांना सोबत घेऊन मोहन कदम यांचा शोध घेण्यासाठी दहिबाव पन्हाळ ‘52 खंड’ हे ठिकाण पुन्हा गाठले. तेथे ग्रामस्थांनी स्वतंत्र गट करून मोहन कदम यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
मोहन यांचा मृतदेह सापडला
शोधकार्य सुरू असतानाच सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास उमा घाडी यांना तेथील जंगलमय भागात मोहन कदम यांचा मृतदेह उजव्या कुशीवर उपडय़ा स्थितीत आढळून आला. याबाबतची खबर तात्काळ देवगड पोलिसांना देण्यात आली. देवगड पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातिवले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण, हवालदार शामराव कांबळे, गणेश चव्हाण यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली.
क्रूरतेने हल्ला केल्याचे निष्पन्न
घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. मयत मोहन कदम यांच्या डोक्यावर मागील बाजूस डाव्या कानावर, कानाच्या जवळ, डाव्या हाताच्या खांद्यावर, दंडावर, कोपरावर व पाठीवर कोणत्या तरी धारदार हत्याराने खोलवर वार करण्यात आले होते. प्रचंड क्रूरतेने मोहन कदम यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत होते.
दरम्यान, घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी मिठबाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास विभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर, त्यांचे सहाय्यक चव्हाण व त्यांच्या टीमने घटनास्थळी भेट देत देवगड पोलिसांना तपासाबाबत मार्गदर्शन केले.
मोहन यांच्या घरापर्यंत जात श्वान घुटमळले
मोहन कदम यांच्या हत्येमागील गूढ उकलणे देवगड पोलिसांसमोर आव्हान ठरणार आहे. देवगड पोलिसांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागामार्फत श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. घटनास्थळावरून संशयित आरोपींचा माग काढत श्वान मयत मोहन कदम यांच्या घरापर्यंत जाऊन घुटमळले. त्यामुळे हत्येमागील नेमके कारण व आरोपींना जेरबंद करणे हे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.